पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष बिनविरोध झाले आहेत.नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते. या पदासाठी ३ अर्ज दाखल झाले होते. यात भाजपाच्या प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील ,राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता.

छाननीत राष्टवादीच्या थिटे यांनी नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही नाही असा आक्षेप घेतला. या बाबत चौकशी अंती उज्वला थिटे यांच्या अर्ज अपात्र ठरवला असल्याची माहिती अनगर नगरपंचायचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली आहे. दरम्यान, या ठिकाणी भाजपाचे सर्व १७ उमेदवारांचे फक्त अर्ज दाखल झाले होते. हे सर्व बिनविरोध झाले. नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक भाजपाचे बिनविरोध झाले आहे.

मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतच्या पहिल्यांदा निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. पाटील यांनी भाजपा मध्ये नुकताच प्रवेश केला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगर पालिका आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी फक्त भाजपाच्या तिकिटावर आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढवायचा निर्णय घेला. त्या प्रमाणे अनगर येथे १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या सर्व उमेदवारा विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे हे सर्व उमेदवार बिनविरोध झाले आहे. तथापी, निवडणूक आयोगाला या बाबतचा अहवाल आणि पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याबाबची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

येथील नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण माहिलासाठी आरक्षित झाले . त्या नुसार माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उज्वला थिटे तर अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला.अर्ज छाननीच्या दिवशी अपक्ष उमेदवार शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या थिटे यांच्या अर्जावर पाच आक्षेप घेतले.यात सूचकाची सही नाही, मतदार यादीतील प्रभाग क्रमाक चुकीचा,मतदार यादीतील अनुक्रमांक चुकीचा,वयाचा पुरावा नाही, सूचकाचा नामनिर्देशन पत्रात चुकीचा क्रमांक असे ५ आक्षेप घेतले.

यावर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी ३ आक्षेप किरकोळ,तांत्रिक हरकती विचारात घेतली नाही. मात्र सूचकाची सही नाही .सही नसणे हि कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याने उज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आल्याची माहिती मुळीक यांनी दिली आहे.अपक्ष उमेदवार यांचा अर्ज माघारी घेतला जाणार आहे. त्यामुळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष बिनविरोध होणार असून याची औपचारिक घोषणा बाकी आहे.असे असेल तरी जिल्ह्यात भाजपाने नगर पालिका आणि नगराध्यक्ष पदाचे खाते खोलले आहे.