Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी सीबीआयने एका प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अशातच आता अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर भाष्य करत देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी एक्सवर(ट्विटर) यासंदर्भातील एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने माझ्या घरी कधीही छापा पडू शकतो, मला अटक केली जाऊ शकते. देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहतोय”, असं अनिल देशमुखांनी म्हटलं आहे. दरम्यान, अनिल देशमुखांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झालेला असताना कृषीमंत्री परळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न, छत्रपती संभाजीराजे यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका

अनिल देशमुख काय म्हणाले?

“जळगावमधील चार वर्षांपूर्वीचं एक जूने प्रकरण उकरून काढत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने ‘सीबीआय’ने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. जळगावमधील भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्या एका प्रकरणात मी गृहमंत्री असताना पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे. माझी माहिती अशी आहे की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने माझ्या घरी कधीही छापा पडू शकतो किंवा मला अटक केली जाऊ शकते. मात्र, महाराष्ट्रातील जनतेला सर्व माहिती आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी ईडी आणि ‘सीबीआय’चा वापर करत राज्यातील राजकारण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. माझी माहिती आहे की, मला अटक केलं जाईल. मला अटक करायचं असेल तर मी तयार आहे”, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

देशमुखांविरोधात गुन्हा दाखल झालेलं प्रकरण काय?

महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक पेन ड्राईव्ह देखील सादर केला होता. तसेच तत्कालीन पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांनी अनिल देशमुख आपल्याला सातत्याने फोन करत होते, असं जबाबात म्हटलं होतं. याप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.