Anna Hazare On Parth Pawar Land Deal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच या प्रकरणात चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. त्याच बरोबर या प्रकरणात गुन्हा देखील झाला आहे.

पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ‘मंत्र्यांची मुलं जर असं वागत असतील तर त्यामध्ये मंत्र्यांचा दोष असतो’, असं मोठं विधान अण्णा हजारे यांनी केलं आहे.

अण्णा हजारे काय म्हणाले?

“मंत्र्यांची मुलं जर असं वागत असतील तर हे दुर्देवं आहे. मंत्र्यांची मुलं जर असं वागत असतील तर यात मंत्र्यांचा दोष आहे. मुलांवर संस्कार महत्वाचे असतात. मुलांवर कुटुंबातील संस्कार, घरातील संस्कार, गावातील संस्कार आणि समाजातील संस्कार महत्वाचे असातात. आता राळेगणसिद्धी एवढं मोठं गाव आहे, पण कधीही गडबड किंवा गोंधळ झालेला नाही”, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

“पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात कारवाई झाली पाहिजे. पण फक्त कारवाई करून हे थांबणार नाही. सरकारने याबाबत योग्य ते धोरण अवलंबलं पाहिजे, कठोर पावलं उचलले पाहिजेत. अशा वागणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे. अशा प्रकारचे निर्णय घेतले तरच कुठेतरी सकारात्मक परिणाम दिसून येतील”, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणावर अजित पवारांनी काय म्हटलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी मुलगा पार्थ पवारच्या खरेदी प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले की, “माध्यमांनी जे काही प्रकरण चालवले आहे. त्याची पूर्ण माहिती आता माझ्याकडे नाही. माझा त्या गोष्टीशी थेट किंवा दुरान्वयेदेखील संबंध नाही. ३५ वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता मला ओळखते. मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याचे ठरवले आहे. दोन-चार महिन्यांपूर्वी असे काहीतरी चालू असल्याचे माझ्या कानावर आले होते. कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नयेत, अशा सूचना मी दिल्या होत्या. पण मधल्या काळात काय झाले? मला माहीत नाही”, असे अजित पवार म्हणाले.

‘मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस’

“मी आजपर्यंत कधीही माझ्या जवळच्या किंवा दूरच्या नातेवाईकाला लाभ होईल, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले नाहीत. मी कधीही अधिकाऱ्यांना फोन करून काही आदेश दिलेले नाहीत. उलट यानिमित्ताने उपमुख्यमंत्री म्हणून मी सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगेन की, जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचे करत असेल किंवा नियमात न बसणारे काम करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल. मी कायद्याच्या आणि नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

‘मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलत असताना या प्रकरणाची सखोल चौकशी करू असे म्हटले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “मघाशी कुणीतरी मला मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया दाखवली. मी म्हणेण मुख्यमंत्र्यांनी जरूर या प्रकरणाची चौकशी करावी. तो त्यांचा अधिकार आहे. त्यातील सत्यता पडताळून पाहणे, हे सरकारचे कामच आहे. पण मी अद्याप या प्रकरणाची माहिती घेतलेली नाही. उद्या माहिती घेऊन सायंकाळी याबाबत वस्तूस्थिती मी मांडेन.”