विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आधी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून मोठं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नव्हता, अशा आशयाचं विधान केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. यावर चर्चा सुरू असतानाच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केल्यामुळे त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीकडून भाजपावर आणि बावनकुळेंवर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी याबाबत बोलताना खोचक शब्दांत टोलेबाजी केली आहे.

काय म्हणाले अरविंद सावंत?

अरविंद सावंत यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना खोचक सल्ला दिला आहे. “त्यांना म्हणावं शुद्धीवर या लवकर. त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दुसतं, पण त्यांच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान लक्षात राहात नाही त्यांच्या. ती कुसळ ते शोधत असतात. बरोबर ते बुमरँग होऊन परत त्यांच्याच अंगावर येतं. आता जा म्हणावं, तिथे संभाजीनगरला वाट बघतायत तुमची. तिथे जाऊन नतमस्तक व्हा. “औरंगजेबजी, मै आया हूँ” असं म्हणा, म्हणजे बरं होईल”, असं अरविंद सावंत यावेळी म्हणाले.

“जितेंद्र आव्हाड भूगोल विसरले का?” ‘त्या’ ट्वीटवरून चंद्रशेखर बावनकुळेंची आगपाखड; म्हणाले, “इतका नीचपणा?”

शिंदे गटाला टोला!

दरम्यान, यावेळी बोलताना अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटालाही टोला लगावला. “मला वाटत नाही काही डॅमेज वगैरे असेल. विनाशकाले विपरीत बुद्धी आहे काही लोकांना. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी एक स्वाभिमान शिकवला. स्वत्व आणि तत्व न सोडण्याचा. बाबासाहेब आंबेडकरांनीही आम्हाला तेच सांगितलं. एक वेळ लढाऊ नाही झालात तरी चालेल, पण विकाऊ होऊ नका. आता विकाऊ झालेल्या माणसांबद्दल काय बोलायचं? ते विकाऊ आहेत. सोडून द्यायचं”, असं अरविंद सावंत यावेळी म्हणाले.