काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात सुरु आहे. त्यात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून भाजपा आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रातच रोखावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तर, यावरून भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंवर ‘पेंग्विन’ म्हणत हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभाग नोंदवला होता. हाच मुद्दा पकडून आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात येऊन राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात. त्यांच्या हातात हात घालून पेंग्विन सेनेचे युवराज चालतात. हे भारत जोडो नाही, भारत तोडो!… यात्रेचा चेहरा राहुल… तुष्टीकरणासाठी घुसखोर आदित्य… अजेंडा तुकडे तुकडे गँगचा!… सगळं ओके असलं तरी, आम्ही जनतेसमोर उघडे पाडणार,” असा इशारा आशिष शेलार यांनी ट्विट करत दिला आहे.

हेही वाचा : “सातारा विकास आघाडीने निवृत्ती घ्यावी”, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल; म्हणाले, “कमिशनमधून किती मलिदा…”

हेही वाचा : आंबडेकर आणि CM शिंदेंच्या भेटीवरून सुषमा अंधारेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाल्या, “दबावाचे…”

काय म्हणाले राहुल गांधी?

हिंगोलीत संबोधित करताना राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुलना केली. “इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना जमीन, पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण, बिरसा मुंडा विकले गेले नाहीत. २४ व्या वर्षी त्यांची हत्या करण्यात आली. हे तुमचे आदर्श ( आदिवासी समाजाचे ) आहे. भाजपा आणि आरएसएसचे आदर्श स्वातंत्र्यावीर सावरकर आहे. दोन-तीन वर्षे ते अंदमान जेलमध्ये होते. तेव्हा त्यांनी इंग्रजांना माफीचे पत्र लिहली,” असे राहुल गांधींनी म्हटलं.

“यात्रा महाराष्ट्रात रोखा”

राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी टीका केली आहे. “राहुल गांधींचे वक्तव्य अत्यंद निंदनीय आहे. राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात रोखा आणि त्यांना कायद्याचं राज्य असल्याचं दाखवून द्या,” अशी मागणी राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar attack aaditya thackeray over rahul gandhi savarkar statement ssa