राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. महाराष्ट्रात असताना या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्याही अनेक नेत्यांनी या यात्रेत आपला सहभाग नोंदवला. नांदेडमध्ये असताना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी या यात्रेचे उत्तम नियोजन केले. या यात्रेदरम्यान अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया यादेखील या यात्रेत सहभागी झाल्या. याच कारणामुळे अशोक चव्हाण आपल्या मुलीला राजकारणात आणण्याच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय. याच चर्चेवर आता अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझा तसा कोणताही विचार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’ने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “त्यांना माझ्यासमोर आणा, मी..,” अभद्र भाषेत बोलणाऱ्या नेत्यांवर राज ठाकरे संतापले; म्हणाले, “…तर बोलण्याची हिंमत होणार नाही”

भारत जोडो यात्रेमध्ये अशोक चव्हाण यांची श्रीजया ही धाकटी कन्या दिसली होती. त्यानंतर श्रीजया राजकारणात सक्रिय होणार का? असे विचारले जात होते. यावरच अशोक चव्हाण यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. “मी माझ्या मुलीला सल्ला देण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण आजची पिढी सल्ला घेण्याच्या मानसिकतेत नाही. ही पिढी कोणाचंही ऐकत नाही. भारत जोडो यात्रा पाच दिवस नांदेड जिल्ह्यात होती. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही या यात्रेसाठी उत्तम नियोजन केले होते. या यात्रेत माझे कुटुंबीयदेखील सहभागी झाले होते. अनेक लोकांसोबत माझ्या मुलीदेखील या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. याचा अर्था माझ्या मुलींना राजकरणात आणण्याची माझी भूमिका होती, असा होत नाही,” असे अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले.

हेही वाचा >> उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या युतीने काय परिणाम होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“त्यांना राजकारणात आणण्याची मी भूमिका घेतलेली नाही. त्यांची इच्छा असेल तर त्या राजकारणात येतील. इच्छा नसेल तर राजकारणात येणार नाहीत. माझी यामध्ये कोणतीही भूमिका नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा,” असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan comment on daughter shreejaya chavan entry in politics prd