Babanrao Shinde Madha Ex-MLA : “विधान परिषदेवर पाठवण्याबाबतचा शब्द मिळाल्याशिवाय कोणत्याच पक्षात प्रवेश करायचा नाही”, अशी भावना माढा येथील संवाद मेळाव्यादरम्यान एका कार्यकर्त्याने माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यासमोर व्यक्त केली. दरम्यान, “पक्ष बदलण्याबाबत मला आज काहीही बोलता येणार नाही”, असं शिंदे म्हणाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांचा पराभव झाला आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील विजयी झाले आहेत. येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) मीनल साठे यांना उमेदवारी दिली होती. मात्र साठे यांना अवघी १३ हजार मतं मिळाली. तर, अभिजीत पाटील यांनी १.३४ लाख मतांसह विजय मिळवला. रणजीत शिंदेंना १.०५ लाख मतं मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, माजी आमदार बबनराव शिंदे यांनी मतदारसंघात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी एक कार्यकर्ता शिंदे यांना म्हणाला, “एकनाथ शिंदे यांचा पक्ष (शिवसेना) असो, अजित पवारांचा पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) असो अथवा भारतीय जनता पार्टी असो, त्यांच्याकडून आपल्याला शब्द मिळायला हवा. आपल्याला सत्तेत जावंच लागेल. कोणतीही किंमत मोजावी लागणार असेल तर ती मोजण्याची आपण तयारी ठेवू. परंतु, सत्तेत चला, नाहीतर लबाड लांडगा आपल्यासमोर उभा आहेच”.

हा कार्यकर्ता बबनराव शिंदे यांना म्हणाला, “उद्या अजित पवार व शरद पवार एकत्र आले तर आपली अडचण होईल. त्यामुळे एकनाथ शिंदे, कमळ किंवा इतर कोणताही पक्ष असो, थोडा उशीर लागला तरी चालेल. परंतु, विधान परिषदेचा शब्द मिळाल्याशिवाय कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा नाही”.

हे ही वाचा >> Uttam Jankar on Ajit Pawar: ‘अजित पवार २० हजार मतांनी पराभूत, महायुतीला फक्त १०७ जागा’, आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा; थेट EVM चं गणित मांडलं

कार्यकर्त्याच्या आवाहनानंतर बबनराव शिंदे यांची सावध प्रतिक्रिया

या मेळाव्यानंतर टीव्ही ९ मराठीने बबनराव शिंदे यांच्याशी बातचीत केली. यावेळी बबनराव शिंदे म्हणाले, “माढा मतदारसंघातील निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं. परंतु, यश मिळालं नाही. आमचा पराभव झाला. राजकारणात अशा घोडी गोष्टी घडत असतात आणि राहिला प्रश्न विधान परिषदेचा तर त्या बाबतीत मला आज काहीही बोलता येणार नाही. परंतु, पूर्वीपासून मी ज्या फळीत काम करतोय, त्याच फळीत भविष्यातही काम करेन”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babanrao shinde reacts on joining bjp shivsena shinde after defeat in assembly election 2024 asc