संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे राज्यातील वरिष्ठ नेते म्हणून गणले जातात. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे ते सदस्य आहेत. असे असतानाही त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीतून काँग्रेसचे पंजा चिन्ह गायब झाले आहे. त्यामुळे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. पक्षाच्या केंद्र आणि राज्य पातळीवर याचे काय पडसाद उमटतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सन १९८५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध उभे रहात अपक्ष म्हणून बाळासाहेब थोरात पहिल्यांदा आमदार झाले. अपक्ष असले तरी मूळचे काँग्रेस विचारसरणीचे असल्याने पुढे ते काँग्रेस सोबत गेले. त्यानंतरच्या सलग सात विधानसभा निवडणुका त्यांनी काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढवल्या आणि जिंकल्या देखील. १९९१ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत प्रथमच काँग्रेसच्या चिन्हावर त्यांनी आपले उमेदवार उभे करत निवडणूक जिंकली. तेव्हापासून मध्यंतरीचा एक अपवाद वगळता नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील सातत्याने पक्षाचे पंजा चिन्ह वापरले गेले.
आमदारकीच्या चाळीस वर्षांमध्ये थोरात यांचा सातत्याने मंत्रिमंडळात समावेश झाला. पुढे त्यांना या पदावरूनही वगळण्यात आल्याने नाराजी न दाखवता ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातून भाचे सत्यजित तांबे यांच्या काँग्रेसच्या उमेदवारीवरून मोठा खेळ झालेला राज्याने पाहिला. त्यावेळी झालेल्या पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे स्वतः थोरात यांना देखील विविध आरोपांचा सामना करावा लागला. त्यामुळे व्यथित झालेल्या थोरात यांनी गटनेतेपदाचाही राजीनामा देऊ केला होता.
आजवरच्या राजकीय प्रवासामध्ये पक्षीय पातळीवर अनेकदा कटू प्रसंगांचा त्यांना सामना करावा लागला असला, तरी पक्षाशी प्रतारणा न करत त्यांनी कायम एकनिष्ठता दाखवली. अर्थात काँग्रेसनेही त्यांना भरभरून दिले. मध्यंतरी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी संगमनेरमध्येच मुक्काम करत थोरात यांचा पाहुणचार घेतला. एक प्रकारे पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने थोरात यांच्यावर दाखवलेला तो कमालीचा विश्वास मानला गेला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी अचानकपणे नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पंजा चिन्ह गायब होणे आश्चर्यकारक मानले जात आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीची सूत्रे थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्या हाती दिली आहेत. संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून थोरात समर्थक उमेदवारी करत आहेत.
सत्यजित यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षातर्फे भरण्यात आलेला आहे. या पक्षाचे सिंह चिन्ह घेऊन निवडणुक लढवण्याचे तांबे यांनी ठरवले आहे. या सगळ्याचे पक्षीय पातळीवर काय पडसाद उमटतात याकडे आता लक्ष लागले आहे.
