खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा मंगळवारी नंदुरबारमध्ये येणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने राहुल गांधी यांच्या या यात्रेच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेत ही मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यात्रेच्या संरक्षणात वाढ करावी

येत्या १२ मार्च रोजी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. त्या निमित्ताने काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांनी डीजीपी रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेला दिल्या जाणाऱ्या पोलीस संरक्षणात वाढ करावी, अशी मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील इतर घटकपक्षदेखील काँग्रेसच्या या यात्रेत सहभागी होणार आहेत.

१२ ते १७ मार्च या काळात यात्रेचा शेवटचा टप्पा

भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवेशाबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी माहिती दिली. “१२ ते १७ मार्च या काळात भारत जोडो यात्रेचा शेवटचा टप्पा असेल. या टप्प्यात इंडिया आघाडीचे इतर घटकपक्ष यात्रेत सहभागी होणार आहेत,” असे जयराम रमेश म्हणाले.

मित्रपक्ष यात्रेत सहभागी होणार

महाराष्ट्रातील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी ( शरद पवार गट) हे इंडिया आघाडीत सामील आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी गट, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडची स्थापना केलेली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचाही समावेश होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत.

गेल्या काही महिन्यांत काँग्रेसला अनेक धक्के

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत काँग्रेसला महाराष्ट्रात मोठे धक्के बसले आहेत. नुकतेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्याआधी बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेसचा राजीनामा देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. असे असताना राहुल गांधी आता भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे या यात्रेला सध्या चांगलेच महत्त्व आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat jodo nyay yatra to enter in maharashtra congress demands extra security to rahul gandhi prd