मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल असं म्हटलं जातं आहे. त्यावेळी स्वतःला शिवसेना म्हणवणारे तोंडाला चिकटपट्टी लावून गप्प का बसले आहेत? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तसंच भाजपाचा झेंडा हा मराठी माणसाचा झेंडा नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले कुठले निर्णय यशस्वी झाले याची उत्तरं जनतेला द्यावीत. ते पत्रकार परिषद का घेत नाहीत? असाही सवाल राऊत यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

” मुंबईवर भाजपाचा झेंडा फडकेल असं जे.पी. नड्डांपासून इतर सगळे नेते म्हणत असतील तर स्वतःला शिवसेना म्हणवणारे जे लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये सामील झालेले ते तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत. भाजपाचा झेंडा हा मराठी माणसाचा झेंडा नाही. हा व्यापाऱ्यांचा आणि शेठजींचा झेंडा आहे. ज्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे अशा विचारांच्या लोकांचा हा झेंडा आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा फुटलेला गट गप्प का? युतीचा काय? आम्ही म्हणतो शिवसेनेचा झेंडा फडकेल आम्ही उघडपणे सांगतो आहोत. तुम्ही गप्प का बसला आहात शेपूट घालून? ” असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे.

मुंबई, ठाणे, नागपूर अशा १४ महापालिकांच्या निवडणुका का घेत नाही? निवडणुका घेतल्यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या निवडणुका घेण्यासाठी भाजपा आणि शिंदे गट का धजावत नाही? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त मन की बात करतात. ते देशाशी का बोलत नाही. या सरकारला नऊ वर्षे झाली आहे. देशासमोर येऊन एकदा देशाच्या पत्रकारांशी चर्चा तर करा. काय घडलं? ते सांगा. नोटबंदी दोनदा का फसली? रुपयाचं अवमूल्यन का झालं? पेट्रोल डिझेलच्या किंमती का वाढल्या? या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत अशीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे. देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरवापर आहे. या देशात राजकारण करणं हे आता भयंकर झालं आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp flag is not marathi people flag said thackeray group mp sanjay raut scj