शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी एक्स या सोशल मीडिया साईटवर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट करून महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांना डिवचले. या व्हिडिओ क्लिपमध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीचे अंश आहेत. त्यातून शिवसेनेच्या लोकांनीच बाबरी मशीद पाडली, असे संजय राऊत यांना सुचवायचे असून त्यांनी तथाकथित राम भक्तांसाठी ही “स्मरण गोळी”, असा मजकूर या पोस्टसोबत जोडला. त्यांच्या पोस्टला आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही एका पोस्टमधून प्रत्युत्तर दिले आहे.

आशिष शेलार यांनी काय उत्तर दिले?

आशिष शेलार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “श्रीमान संजय राऊत… अहंकार, विस्मरण असे आजार आपल्याला झालेत. कारण… विशाल ह्रदयाच्या हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान, विचार, पक्ष आणि राजकीय वारसदार आदी सगळे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिवसैनिकांकडे आहेच. ते रामाला मानतात आणि पंरपराही जोपासतात.”

“त्यामुळे प्रश्न हा उरतोच की, शिल्लक राहिलेल्या तुमच्या सारख्या कोत्या मनाच्या उबाठा गटाचा राम मंदिराशी संबंध काय? मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी काँग्रेस, शरद पवार आणि समाजवादीशी हात मिळवणी केलीत ना? एकदा तुमचे हात स्वच्छ पाण्यात बुडवून पहा… कोठारी बंधूचे रक्त स्पष्ट तुम्हाला दिसेल! म्हणून लक्षात ठेवा… बघा आम्हाला बोलायला लावू नका… बरेच शिल्लक आहेत आमच्याकडे अस्सल डोस भगवे तुम्ही भर चौकात होऊ शकता हं नागवे!”, असेही आशिष शेलार यांनी पुढे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी काय पोस्ट केले होते?

संजय राऊत यांनी आज सकाळी केलेल्या पोस्टमध्ये “श्रीमान फडणवीस, श्रीमान गिरीश महाजन, श्रीमान आशिष शेलार वैगरे वैगरे… तथाकथित राम भक्तांसाठी.. ही स्मरण गोळी”, अशा मजकूरासहीत एक पोस्ट टाकून त्यासह एक व्हिडिओ जोडला होता. ज्यात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वृत्तावाहिनीला दिलेल्या प्रतिक्रिया होत्या.

हे वाचा >> “६ तारखेला अयोध्येत जे घडलं ते…”, अटल बिहारी वाजपेयी तेव्हा काय म्हणाले होते? राऊतांनी ट्वीट केला Video!

अटल बिहारी वाजपेयी एका मुलाखतीत म्हणतात, “६ डिसेंबर रोजी अयोध्येत जे झाले, ते अतिशय दुर्दैवी होते. ते घडायला नको होते. आम्ही ते थांबविण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अपयशी ठरलो. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कारसेवक नियंत्रणाच्या बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांच्याहातून जे झाले, ते व्हायला नको होते.”

तसेच लालकृष्ण अडवाणी यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीचा अंश या व्हिडिओ क्लिपमध्ये आहे. ज्यात अडवाणी म्हणतात, “तो माझ्या आयुष्यातील सर्वात खेदजनक दिवस होता. सूत्रसंचालकाने अडवाणींना प्रश्न केला की, ती मोठी चूक होती का? यावर अडवाणी म्हणाले, निश्चितच ती एक मोठी चूक होती. मी त्यावेळी उमा भारती यांना सांगितले की, तुम्ही जाऊन कारसेवकांना मशिदीच्या खाली उतरवा. त्या थोड्या वेळाने परत आल्या आणि म्हणाल्या, मशिदीवर काही लोक चढलेले आहेत आणि ते मराठीत बोलत आहेत. ते माझे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. मग मी प्रमोद (महाजन) यांना पाठविले. पण तेही नाउमेद होऊन परत आले.”

राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे नेते रज्जू भैया जे त्याठिकाणी उपस्थित नव्हते. त्यांची दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया आली की, मी या घटनेचा निषेध करतो, असेही अडवाणी म्हणतात. या व्हिडिओतून भाजपा आणि संघ यांचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नव्हता, हे संजय राऊत यांना सुचवायचे होते.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये सगळ्यात शेवटी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखतीचा एक भाग असून त्यात बाबरीमध्ये जे घडलं, त्याचा अभिमान असल्याचं बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत. “ती अभिमानाची बाब आहेच. यात कोणतीही शरमेची बाब नाहीये. बाबरी मशीद पाडलेली नाही, त्याच्याखालचं राम मंदिर आम्ही वर आणलं आहे”, असं बाळासाहेब ठाकरे तेव्हा म्हणाले होते.