अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी देशभरातील मान्यवर, नेतेमंडळी व सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, अयोध्येत या घडामोडी घडत असताना महाराष्ट्रात मात्र बाबरी मशीद पाडली त्या प्रसंगावरून राजकारण रंगल्याचं दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात दावा करताना शिवसेना तिथे नव्हती, असं म्हटलं आहे. तर त्यावर प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या विधानांचे संदर्भ दिले आहेत. आता राऊतांनी थेट त्या वेळच्या या नेत्यांनी दिलेल्या मुलाखतींचे व्हिडीओच पोस्ट केले आहेत.

देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

“मी काही लोकांची पर्वाच करत नाही. जेव्हा कारसेवा करायची होती तेव्हा हे लोक लपून बसले होते. हे कुणीही कारसेवेसाठी गेले नाहीत. मी त्यांच्यावर काय बोलायचं? आम्ही कारसेवक आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. तिन्ही कारसेवांमध्ये मी गेलो होतो. मी बदायूच्या तुरुंगात गेलो आहे. जेव्हा कलंकित ढाचा पाडला गेला तेव्हाही मी तिथे उपस्थित होतो. आता काही लोक जळतात कारण ते घाबरुन घरी बसले होते. मी त्यांच्याविषयी कशाला बोलायचं?” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं होतं. त्यावर आता संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

काय आहे संजय राऊतांच्या पोस्टमध्ये?

संजय राऊतांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार या भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे. “महाराष्ट्रातील श्रीमान फडणवीस, श्रीमान गिरीश महाजन, श्रीमान आशिष शेलार वगैरे वगैरे तथाकथिक राम भक्तांसाठी ही ‘स्मरण गोळी’. उगाळून घ्या. आणखी देखील जालीम डोस आहेत. योग्य वेळी देऊच”, असं राऊतांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी व बाळासाहेब ठाकरे या तीन नेत्यांच्या मुलाखतींमधला काही भाग एकत्र करण्यात आला आहे. त्यात बाबरी मशीद पाडण्याच्या प्रसंगावर हे तिन्ही नेते भूमिका मांडताना दिसत आहेत.

बाबरीवर काय म्हणाले अटल बिहारी वाजपेयी?

“६ तारखेला अयोध्येत जे घडलं, ते दुर्दैवी होतं. ते घडायला नको होतं. आम्ही ते रोखण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला त्यात यश आलं नाही. आम्ही त्यासाठी माफी मागतो. कारसेवक नियंत्रणाबाहेर गेले. त्यांनी असं काही केलं, जे व्हायला नको होतं”, अशी स्पष्ट भूमिका अटल बिहारी वाजपेयींनी एका मुलाखतीत मांडल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

“अयोध्येच्या मंदिरात प्रभू श्रीरामाला एकटं…”, रामायण मालिकेतल्या सीतेची पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘ही’ विनंती

लालकृष्ण आडवाणींनीही व्यक्त केला होता खेद

दरम्यान, लालकृ्ष्ण आडवाणींनीही बाबरी पाडल्याच्या घटनेवर खेद व्यक्त केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. “मी याला माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस म्हणेन. ती एक गंभीर चूक होती. त्यात शंकाच नाही. मी आधी उमाला (भारती) सांगितलं की तिथे जाऊन त्या सगळ्यांना खाली यायला सांग. पण तिनं येऊन मला सांगितलं की तिथे सगळ्यात वर काही मराठी माणसं आहेत आणि ते माझं ऐकत नाहीयेत. मग मी प्रमोदला (महाजन) पाठवलं. प्रमोदही निराश होऊन परत आला”, असं आडवाणी म्हणाले होते.

“आरएसएस नेते रज्जूभय्या तिथे नव्हते. दुसऱ्या दिवशी ते म्हणाले की मी त्या घटनेचा निषेध करतो. मी रज्जूभय्यांच्या मताशी सहमत आहे”, असंही आडवाणींनी म्हटल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “मला अभिमान आहे”

दरम्यान, या व्हिडीओमध्ये सगळ्यात शेवटी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखतीचा एक भाग असून त्यात बाबरीमध्ये जे घडलं, त्याचा अभिमान असल्याचं बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत. “ती अभिमानाची बाब आहेच. यात कोणतीही शरमेची बाब नाहीये. बाबरी मशीद पाडलेली नाही, त्याच्याखालचं राम मंदिर आम्ही वर आणलं आहे”, असं बाळासाहेब ठाकरे तेव्हा म्हणाले होते.