भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याशी पुणे महानगर पालिकेच्या आवारत झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात पडायला सुरुवात झाली आहे. भाजपाकडून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतानाच हा किरीट सोमय्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधतानाच गंभीर इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झेड सुरक्षा भेदून हल्ला झालाच कसा?

चंद्रकांत पाटील यांनी हा किरीट सोमय्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. “अनिल देशमुख चकवा देत राहिले. नंतर त्यांना अटक झाली. संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. खुद्द ठाकरे कुटुंबीयांवर देखील आरोप झाले, पण यात कधीही अशी स्थिती आली नव्हती की किरीट सोमय्यांवर हल्ला व्हावा. केंद्राची झेड सुरक्षा असताना त्यांना धक्के मारून किरीट सोमय्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न हा गेल्या २७ महिन्यांत पहिल्यांदा झाला”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

“काय चाललंय काय?”

“तुमचा न्यायालयांवर विश्वास नाही का? तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. अनेक प्रकरणं झाली, पण असं कधी झालं नाही. घरात घुसू, नागपुरात जाऊ देणार नाही, अरे काय चाललंय काय?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, “रोज उठून माध्यमांमध्ये धमक्या दिल्या जातात. आम्ही वाघ आहोत, मुंबई आमची आहे वगैरे”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर निशाणा देखील साधला.

“पालिकेची सुरक्षा झोपा काढत होती का?”

दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगर पालिकेच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आता फार झालं. किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला आम्ही सहजासहजी घेणार नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांना मी पत्र लिहिलं आहे की याची गंभीर दखल घ्यावी लागेल. पुणे पोलिसांनी तकलादू कलमं लावली. पुणे पालिकेची सुरक्षा काय झोपा काढत होती का? सुटी असताना पालिकेच्या आत १०० लोकं कशी आली? पुणे पालिकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली. त्यांनी पुणे आयुक्तांना दोन दिवसांची नोटीस दिली आहे”, असं पाटील यावेळी म्हणाले.

“आम्ही घरात घुसलो तर नागपुरात जाणं मुश्किल होईल,” राऊतांच्या इशाऱ्यावर फडणवीस म्हणाले, “रोज सकाळी ९ वाजता…”

“राज्यात टोळीचं सरकार आहे का?”

“राज्यात टोळीचं सरकार आहे का? जिथे एक गृहमंत्री जेलमध्ये आहेत, मुंबईचे आयुक्त आधी फरार होते आणि आता विधानं करत आहेत. सीताराम कुंटे यांनी आरोप केला आहे की पोलिसांच्या बदल्यांच्या विषयात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख चिठ्ठी पाठवायचे. अनिल देशमुख म्हणतायत माझ्याकडे अशी चिठ्ठी अनिल परब पाठवायचे. व्हटकर नावाचे अधिकारी म्हणतात बदल्यांमध्ये चौकटीच्या बाहेर काम करण्यात महाविकास आघाडीच्या सरकारचा हात कुणीच धरणार नाहीत. हे आरोप आम्ही करत नाहीत. त्यांची तोंडं बंद करा, त्यांच्यावर हल्ले करा”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mah president chandrakant patil slams sanjay raut attack on kirit somaiya pmw