मुंबईतील भायखळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे असलेले नाट्यगृह बंद आहे. यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहलं आहे. नाटगृहाच्या उद्घाटनाचे काम १७ महिन्यांपासून रेंगाळलेलं असून, ते आपण दिवाळीच्या अगोदर मार्गी लावावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं नाट्यगृह लोककलाकार रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी सुरू करावे, अशी मागणी पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहलेल्या पत्रात म्हटलं की, “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक प्रखर आवाज, वंचित बहुजनांच्या वेदनेला आपल्या साहित्य, पोवाडे, लावण्यांमधून जागतिक पातळीवर पोहचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. त्यांच्या स्मृतींमधून आजही आपणाला प्रेरणा मिळते. परंतु, गेल्या तब्बल ३८ वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने भायखळा येथे असलेले नाट्यगृह बंद पडले आहे. त्या नाट्यगृहाची दुरावस्था झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लोककलाकारांचा आणि अण्णाभाऊ साठेंच्या कर्तृत्वाचा अपमानच होतोय. ही मोठी शोकांतिका आहे.”

हेही वाचा – “शिंदे व उद्धव ठाकरेंच्या भानगडीत बाळासाहेबांची पुण्याई…”; एकनाथ खडसेंचं विधान!

“तत्कालीन आघाडी सरकारने निधी देण्यास…”

“अण्णाभाऊंच्या नावाने हे नाट्यगृह सुरु करण्यात आलं होतं. मात्र, गेली ३८ वर्षे या सभागृहावर पडदा पडला आहे. १९६३ पासून लावणी, भारुड इत्यादी लोककलांच्या सादरीकरणासाठी या खुल्या रंगमंचाचा वापर केला जात होता. ४५० प्रेक्षकांसाठी हे खुलं नाट्यगृह महापालिकेने सुरु केले होते. पण, १९८४ ला हे नाट्यगृह बंद करण्यात आले. २००३ पर्यंत पडीक असणाऱ्या सभागृहाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव चर्चेत आला. त्यावेळी १३ कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु, तत्कालीन आघाडी सरकारने निधी देण्यास नकार दिल्यामुळे हे सभागृहाचे काम रखडले,” असा निशाणा पडळकर यांनी तत्कालीन सरकारवर साधला आहे.

हेही वाचा – ऋतुजा लटके यांच्याबाबतीत भेदभाव का? मुंबई हायकोर्टाने खडसावलं, पालिका म्हणाली “आम्ही आदेश देतो, पण…”

“फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या…”

“२०१४ ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने प्रस्ताव तयार केला. त्यानंतर ७५० आसन क्षमतेचं सभागृह उभं राहिलं. २०२१ पासून १७ महिने उलटले तरी हे सभागृह उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. आता बहुजन हिताचा विचार करणारे कार्यक्षम सरकार सत्तेवर आहे. नुकतेच देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु, मुंबई येथील सभागृह उद्घाटनाचे काम १७ महिन्यांपासून रेंगाळलेले आहे ते आपण दिवाळीच्या अगोदर मार्गी लावावे. तसेच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं नाट्यगृह लोककलाकार रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी सुरू करावे. हाच खरा लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्य साधनेचा गौरव असेल,” असेही गोपीचंद पडळकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla gopichand padalkar write lettes cm eknath shinde over reopen annabhau sathe natyagruh bhaykhala in mumbai ssa