मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (९ ऑगस्ट) राहुल गांधी लोकसभेतही परतले. लोकसभेत परतल्यावर केलेल्या पहिल्याच भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. राहुल गांधी यांच्यासह विरोधी बाकांवरील खासदारांनी मणिपूर प्रश्नावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सभागृहात राहुल गांधींनी केलेल्या एका कृतीमुळे राजकीय वातावरण तापलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाषण केल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभा सभागृह सोडलं. राहुल गांधी बाहेर पडत असताना त्यांच्या हातातल्या काही फाईल्स खाली पडल्या. त्या फाईल्स उचलण्यासाठी राहुल गांधी खाली वाकले. तेव्हा तिथे बसलेले भाजपा खासदार राहुल गांधींवर हसले. भाजपा खासदारांच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून राहुल गांधींनी या सर्व खासदारांना पाहून फ्लाइंग किस दिलं.

हेही वाचा- “पंतप्रधान मोदींचं वक्तव्य पूर्णपणे असत्य”, शिवसेना-भाजपा युती तोडण्याबाबत एकनाथ खडसेंचं महत्त्वाचं विधान

यानंतर भाजपाच्या मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या कृतीवर जोरदार आक्षेप घेत कारवाईची मागणी केली. याबाबत भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अघ्यक्षांकडे तक्रारही दाखल केली. या सर्व घडामोडींनंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचं इतकं घाण प्रकरण समोर आलं, तरीही स्मृती इराणी यावर काहीच बोलल्या नाहीत, अशी टीका खैरे यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “गौतम अदाणींसाठी मणिपूरमध्ये…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर खळबळजनक आरोप

चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले, “काल राहुल गांधींनी सभागृहात फ्लाइंग किस दिला. यामुळे आमच्या भगिनी स्मृती इराणी यांना मिरची लागली. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे, त्यामुळे मी आमच्या भगिनींना विचारू इच्छितो की, किरीट सोमय्यांचं इतकं घाण आणि वाईट प्रकरण समोर आलं. त्यावर तुम्ही काहीच बोलले नाहीत. किरीट सोमय्यांचा तो व्हिडीओ जवळपास ५० कोटी लोकांनी पाहिला.”

हेही वाचा- “जेवढं विष तुम्ही…”, राहुल गांधींनी सभागृहात दिलेल्या ‘फ्लाइंग किस’वर प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरण नेमकं काय आहे?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या कथित व्हिडीओमध्ये भाजपाचे नेते किरीट सोमय्या नग्न अवस्थेत विचित्र हावभाव करत होते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधान परिषदेतही उपस्थित केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant khaire on smruti irani statement about rahul gandhi flying kiss rmm