बीड : आमचा मराठा समाजाला कुठलाही विरोध नाही. मराठा समाज व ओबीसींमध्ये आंतर पाडण्याचे काम आंतरवालीच्या पाटलांनी केले, असा घणाघाती आरोप करत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्ष्य केले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची व मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीची चित्रफित ‘दाखव रे तो व्हिडिओ’ अशा शैलीमध्ये बोलत भुजबळ यांनी वडेट्टीवारांवरही टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातगणना करावी, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. या मेळाव्यात माजीमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी थेट नामोल्लेख टाळून जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.

बीड येथील महाएल्गार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, नवनाथ वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याला मोठी गर्दी होती. यावेळी भुजबळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंना जाऊन भेटतात, याकडे लक्ष वेधत हैदराबाद गॅझेटवरून काढलेल्या अध्यादेशावरून टीका केली. अध्यादेशातील पात्र हा शब्द एका तासात बदलून दिला जातो. कुणबीसाठी सकाळी अर्ज केला की सायंकाळपर्यंत प्रमाणपत्र दिले जात आहे. इतकी यंत्रणा गतिमान कधीपासून झाली, असा सवाल भुजबळांनी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांना विचारला.

भुजबळांनी जरांगे पाटील यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्यांमध्ये बहुतांश हे वाळूचोर, दारूवाले आदींचा भरणा होता. तुम्ही पाडण्याचे आदेश देऊ शकता, तसे आम्हीही देऊ शकताे, हे ध्यानात ठेवावे. ५४ टक्के ओबीसी, १३ टक्के दलित, ७ टक्के आदिवासी, ३ टक्के ब्राह्मण मग उरलेल्यामध्ये किती मराठा समाज आहे, असा प्रश्नही भुजबळ यांनी केला. मुख्यमंत्र्यांना उद्देशून भुजबळ म्हणाले, फडणवीस यांना आम्हाला सांगायचे आहे की, ही मंडळी तुमच्या वाईटावर आहे, त्यांचे लक्ष्य ओबीसी नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस आहेत, असेही भुजबळ म्हणाले.

आमदार धनंजय मुंडे यांनीही मनोज जरांगे पाटील यांना थेट नामोल्लेख टाळून लक्ष्य केले. त्यांनी मराठा समाजाच्या आम्ही विरोधात नसून, त्यांना १० टक्के आरक्षण दिलेले आहे ते त्यांनी घ्यावे, असे आवाहन करून ओबीसींसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत करावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली.