Chhagan Bhujbal On Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी महायुती सरकारमध्ये नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. खरं तर महायुतीचं सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज झाले होते. एवढंच नाही तर त्यांनी अजित पवारांवर टीका देखील केली होती. तसेच जहां नहीं चैना, वहां नहीं रहना असं म्हणत थेट पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. यानंतर अखेर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे.
खरं तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावर छगन भुजबळ यांची वर्णी लागल्याचं बोललं जातं. पण असं असतानाच आता छगन भुजबळ यांनी एक मोठं विधान केलं आहे. मंत्रिपदाची शपथ घेऊन काही दिवस झाले असतानाच छगन भुजबळ यांनी थेट राजीनाम्याबाबत भाष्य केलं आहे.’धनंजय मुंडे जर सर्व आरोपातून मुक्त झाले तर मी राजीनामा देईन’, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. तसेच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ यांनी राज्यातील राजकीय विषयांवर भाष्य केलं आहे. खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची? तसेच खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची? यावर देखील छगन भुजबळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांना जर क्लीनचिट मिळाली तर असं विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले की, “धनंजय मुंडे यांना जर क्लीनचिट मिळाली तर काही हरकत नाही. माझी पुनर्स्थापना झालेली आहे. मी पुन्हा सन्मानाने आलेलो आहे. धनंजय मुंडे जर सर्व आरोपातून मुक्त झाले आणि सगळी लाईन क्लिअर असेल तर मी छगन भुजबळ राजीनामा देईन, संपला विषय”, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. तसेच अशा पद्धतीची अजित पवार यांच्याबरोबर काही चर्चा झालेली आहे का? असं विचारलं असता चर्चा झालेली असो किंवा नसो. राजीनाम्याचा निर्णय मीच घेईन, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
खरी शिवसेना कोणाची?
खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची? असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, “मी यावर काही जरी सांगितलं तरी तुम्हाला माहिती आहे की मी सध्या एका शिवसेनेबरोबर सरकारमध्ये आहे. मात्र, शिवसेनेत काम करणाऱ्या सर्व लोकांवर माझं प्रेम आहे. माझं यावर उत्तर असं आहे की माझं प्रेम बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे. आता एकनाथ शिंदे हे देखील म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर माझं प्रेम आहे”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची?
खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “आपण हे मान्य केलं पाहिजे की शरद पवार या वयात देखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षाही जास्त काम करतात. अजित पवार सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करतात, मी त्यांचं सांगणार नाही. पण शरद पवार आजही काम करतात. मात्र, २०१४ मध्ये काय झालं? दिल्लीतून सांगावा आला की तुम्ही (राष्ट्रवादी) कॉग्रेस सोडा आणि आम्ही (भाजपा) शिवसेना (ठाकरे) सोडतो. त्यानंतर आम्ही वेगवेगळे लढलो”, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.
“तेव्हा वेगवेगळे लढायला सांगितलं आणि नंतर तुमचा आम्ही मंत्री म्हणून समावेश करतो असं सांगितलं. मग काय झालं? त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, आम्ही देखील वेगवेगळे लढलो. त्यानंतर दोन महिन्यांत आम्ही जाणार होतो. मात्र, शरद पवार आमच्यासमोर अलिबागमध्ये म्हणाले की मी भाजपाला कायमचा सपोर्ट करणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देखील घाबरले. त्यानंतर एका उद्योगपतीच्या घरी देखील चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd