Jayant Patil Resignation As President Of NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा आहेत. अशात पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याची माहिती एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दिल्याने, जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला होता. यावर त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांनी जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा आणि जे नवीन होणार आहेत त्यांनाही शुभेच्छा. सर्वांनी चांगले काम करावे यासाठी शुभेच्छा.”

दरम्यान, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही माध्यमांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला होता. मात्र, माध्यमांच्या या प्रश्नाला उत्तर न देता अजित पवार तेथून निघून गेले.

जितेंद्र आव्हाडांनी राजीनाम्याचे दावे फेटाळले

एकीकडे सर्वत्र जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या बातम्या येत असताना, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटीलच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याची पोस्ट एक्सवर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जयंत पाटीलच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारित होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार आणि शिस्तीनुसारच चालत असतो.”

अजित पवार गटाच्या आमदाराची प्रतिक्रिया

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी, जयंत पाटील त्यांच्या पक्षात आले, तर स्वागतच असेल, असे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “जयंत पाटील यांच्याबाबतच्या चर्चा अनेकदा आपण ऐकल्या आहेत. ते प्रदेशाध्यक्ष नव्हते, तेव्हा त्यांच्या मतदारसंघातील अनेक कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असायचे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते स्थिर झाले होते. पण महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून त्यांच्याबाबत चर्चा होत आहेत. आता त्यांनी राजीनामा दिला आहे. त्या चर्चांमध्ये कुठेतरी तथ्य आहे. इतर पक्षांमध्ये जाणार, यामध्येही तथ्य आहे, असे आपल्याला पाहायला मिळत आहे.”