वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर-सोलापूरमध्ये करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी “ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है”, असा नारा देत मोदी सरकारवर खोचक शब्दांत निशाणा साधला. तसेच, ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवरून देखील त्यांनी टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हा गेम त्यांच्यावरच उलटणार”

“आता जे या पद्धतीने ईडीचा वापर करत आहेत, हाच गेम त्यांच्यावरच उलटणार आहे. आता तेच होताना देखील दिसत आहे. शेवटी या सगळ्या संस्था स्वायत्त आहेत. काँग्रेसनं कधी त्यांचा वापर केलेला नाही. आमची तशी संस्कृती देखील नाही. कधी ना कधी ते उलटतंच”, असं प्रणिती शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या.

“ईडी ठराविक गुन्ह्यांमध्येच तपास करते. त्यांनी तशाच प्रकारे निवडक गुन्ह्यांमध्ये तपास करायला हवा. पण आता कुणी छोटंसं काही केलं तरी हे ईडी आणतात. परवा कोल्हापुरात चंद्रकांत पाटील म्हणाले की तुम्ही पेटीएमवर काही केलं तरी ईडी येईल. म्हणजे यांनी हे सिद्ध केलं आहे की ईडी त्यांच्यासाठीच काम करते आणि मागच्या दारात बसलीये”, असा टोला त्यांनी लगावला.

“…तेव्हा मनमोहन सिंगांना बांगड्या पाठवल्या होत्या”

देशात महागाई सातत्याने वाढत आहे. पण मोदी सरकार ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. गोरगरीबांना छळणारे मुद्दे असताना मोदी सरकार आणि भाजपा सरकार हे मुद्दे बाजूला ठेवून वेगळेच मुद्दे हाताळत आहे. जात-पात-धर्म यावरच अजेंडा जात आहे. काँग्रेसच्या काळात सिलेंडर ३५० झालं होतं, तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी आमचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांना बांगड्या पाठवल्या होत्या. बांगड्या पाठवणं कमी असण्याचं प्रतीक नाही. त्यातून त्यांनी काय सिद्ध केलं? आता १००० रुपये सिलेंडर झालं आहे. तर आता आम्ही त्यांना नेमकं काय पाठवू?” असा सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mla praniti shinde targets pm narendra modi bjp on inflation pmw