संगमनेर: अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. सतत भूलथापा देऊन आणि जातीयवाद करून सत्तेवर आलेल्या महायुतीचे खरे रूप जनतेला कळाले आहे. यामुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.

संगमनेर येथे जिल्हा काँग्रेस काँग्रेसची बैठक माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी आमदार हेमंत ओगले, कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, प्रताप शेळके, मधुकरराव नवले, राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, अकोले तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, पारनेरचे संभाजी रोहोकले, ॲड. पंकज लोंढे, बाबासाहेब दिघे, किरण पाटील, शब्बीर शेख, शहाजी भोसले, संभाजी माळवदे, तुषार पोटे, सचिन चौगुले, समीर काझी, राहुल उगले, नसीर शेख, दादा पाटील वाकचौरे ,अरुण मस्के, नितीन शिंदे, साहेबराव बागुल,अरुण मस्के, रिजवान शेख आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये जिल्हा समिती सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची एकमुखी मागणी केली. याप्रसंगी बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणाले, काँग्रेस पक्षाला मोठी विचारधारा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर जिल्ह्यातील नागरिकांचा विश्वास आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यामुळे या सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी जिल्ह्यातील काँग्रेसजणांची प्रमुख मागणी आहे.

कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, महायुतीच्या भूलथापांना लोक कंटाळले आहेत. खरे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव निश्चित होता. परंतु महायुती का जिंकली हे सर्वांना माहीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी असून काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले म्हणाले की, शिव-फुले-शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेसचा विचार आहे. हा विचार लोकशाही वाचवण्यासाठी असून काँग्रेससाठी आता जनता एकवटली असल्याने आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याची गरज आहे.

याप्रसंगी करण ससाणे, शहाजी भोसले, अरुण मस्के, सचिन चौगुले यांच्यासह विविध तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आपली मनोगते व्यक्त करताना स्वबळाचा सूर आळवला.