बीड : जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी ही सामान्य नसून शेतात काहीही उरलेले नाही. यामुळे सरकारने चार पावले पुढे येत शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. प्रति एकर ५० हजारांची मदत करावी. ही मदत प्रती एकर हवी आहे हेक्टर नाही, अशी मागणी करत राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी , पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ज्यांनी वकिली केली त्यांनी तो आणावा असेही तिरकसपणे सुचवले.

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांना ३० हजार रुपये एकरी तर जनावरे वाहून गेलेल्यांना ६० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी आता बसला तर पुन्हा उठणार नाही.

आमची कर्जमाफीची मागणी आहे यावर योग्य वेळी देऊ असे सरकार म्हणत आहे. मात्र, कर्जमाफी देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले. सरकारला कोठे पैसे खर्च करायचे हे कळत नाही, हीच अडचण असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीनेही आता प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमले असूने सत्य परिस्थिती जाणून घ्यावी असे नेत्यांना कळविण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्याकडे बीड व लातूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.