महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. महायुतीकडून मनसेला एक किंवा दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा चर्चेत असतानाच आता उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२० मार्च) रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केली आहे. या दोन नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, यावर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण पाहायला मिळू शकतं. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीत लोकसभेबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट झाली. या भेटीवर आता बोलण्यापेक्षा एक-दोन दिवस वाट पाहा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी नीट समजतील”, असं सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. त्यापाठोपाठ काल रात्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीस यांना प्रश्न विचारला की, तुम्ही रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे, या भेटीत काय बोलणं झालं? यावर फडणवीस म्हणाले, आमची भेट रात्री उशिरा झाली की लवकर झाली या भानगडीत तुम्ही का पडता? तुम्ही फार त्या भानगडीत पडू नका. अशा भेटी होत असतात. यात नवीन काय आहे?

हे ही वाचा >> शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचं मोठं विधान; म्हणाल्या, “हे सगळं राजकारणापुरतं आहे, निवडणुका संपल्या की…!”

राज ठाकरे – अमित शाह भेटीवर बाळा नांदगावकर काय म्हणाले?

“राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. दोन दिवसांत युतीबाबत अंतिम निर्णय होईल. याआधी मी दोनदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. आता राज ठाकरे यांनी सांगितल्यास गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो. राज ठाकरे सांगतील त्यानुसार निर्णय घेऊ”, असं बाळा नांदगावकर म्हणाले होते.