Premium

“शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस सावध झाले आणि…”, छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत शरद पवारांविषयी एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे.

What Bhujbal Said?
छगन भुजबळ यांनी नेमकं काय सांगितलं? (फोटो-लोकसत्ता-ग्राफिक्स टीम)

शरद पवारांनी आठवेळा भाजपाशी चर्चा केली होती. त्यांच्याबरोबरच जायचं असं ठरलं होतं. २०१४ मध्ये तसं घडलंही. मात्र शरद पवारांनी त्यानंतर एक वक्तव्य केलं आणि देवेंद्र फडणवीस सावध झाले असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी २०१४ ते २०१९, त्यानंतर २०२२, २०२३ मध्ये काय काय घडलं ते सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले छगन भुजबळ?

२०१४ ला जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा भाजपाने शिवसेनेशी युती तोडली. मात्र त्यांनी शरद पवार यांना निरोप पाठवला की आम्ही शिवसेनेला सोडतोय तुम्ही काँग्रेसला सोडा. ज्यानंतर काहीच कारण नसताना आम्ही काँग्रेसची साथ सोडली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सगळे पक्ष वेगळे लढले होते. त्यावेळी (२०१४) असं ठरलं होतं की काही दिवस भाजपाचं सरकार चालवेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील होईल असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. मतमोजणीच्या आदल्या दिवशीही आम्ही शरद पवारांसह होतो. कमी पडले तर बाहेरुन पाठिंबा द्यायचा हे सांगण्यात आलं होतं. मतमोजणीच्या दिवशी शरद पवारांना फोन आला की आता तुम्ही बाहेर येऊन सांगा की आम्ही पाठिंबा देतो. त्यानंतर २०१४ ला प्रफुल पटेल यांनी जाहीर केलं की आम्ही सरकारला पाठिंबा देतोय. एकनाथ शिंदे तेव्हा (२०१४) विरोधी पक्षनेते झाले होते.

शरद पवार यांचं वक्तव्य आणि फडणवीस सावध झाले

यानंतर अलिबागला काही दिवसांनी एक बैठक झाली. त्यात शरद पवारांनी हे थेट जाहीर केलं की भाजपाने आमचा पाठिंबा कायमस्वरुपी गृहित धरु नये. मी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील सगळे शरद पवारांना भेटलो. त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही असं का बोललात त्यावर शरद पवारांकडे काहीच उत्तर नव्हतं. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस सावध झाले. त्यानंतर त्यांना लक्षात आलं गडबड आहे. त्यांनी तातडीने एकनाथ शिंदेंना, शिवसेनेला बरोबर घेऊन त्यांना मंत्रिपदं वगैरे देऊन टाकली. २०१७ लाही एक बैठक झाली. त्यावेळी किती मंत्री, कुठली खाती? पुढच्या निवडणुकीत जागावाटप, खासदारकीच्या जागा सगळं ठरलं. त्यानंतर शरद पवारांनी असं सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर येतो पण शिवसेनेला तुम्ही सोडा. भाजपाने त्याला नकार दिला. त्यामुळे ती बोलणीही फिस्कटली असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. २०१४ ला काँग्रेसला सोडलं, शिवसेनेला काही दिवस सत्तेबाहेर बसवलं. २०१७ ला चर्चा करुन सांगितलं शिवसेनेला सरकारबाहेर काढा. हे सगळं शरद पवारांनीच केलं होतं.

२०१९ लाही भाजपाबरोबर जायचंच ठरलं होतं

२०१९ ला निवडणूक झाली. परत सगळ्या गोष्टी ठरल्या. राष्ट्रपती राजवट लावण्याची कल्पना शरद पवारांचीच होती हे देवेंद्र फडणवीस यांचीच होती. २०१९ मध्ये जे घडलं ते सगळं शरद पवारांना ठाऊक होतं. भाजपा आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन करणार हे ठरलं होतं. त्यामुळे भाजपाने शिवसेनेची साथ सोडली. त्यावेळीच भाजपा बरोबर जायला हवं होतं. मात्र शरद पवारांनी तेव्हाही माघार घातली. त्यावेळी शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि मला पाठिंबा द्यायला जमणार नाही सांगितलं. त्यानंतर एकनाथ शिंदे जेव्हा भाजपाबरोबर गेले त्याआधीही चर्चा झालीच होती.

महाविकास आघाडी असतानाही भाजपाबरोबर जायचं ठरलं होतंच

महाविकास आघाडी असतानाही भाजपाबरोबर जाणारी चर्चा झालीच होती. शरद पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे सगळे चर्चा करत होतेच. ५४ आमदारांनी भाजपाबरोबर जाऊ म्हणून सह्याही केल्या होत्या. त्यानंतरही शरद पवार म्हणाले जमणार नाही, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. या सगळ्या घडामोडी जेव्हा घडल्या तेव्हा घरात (शरद पवारांच्या) चर्चा झाली. ती अजित पवारांना माहित असावी. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राजीनामा द्यायचा, त्यानंतर सुप्रिया सुळे अध्यक्ष होतील. सुप्रिया सुळेंच्या बरोबर आपण भाजपात जायचं असं ठरलं होतं. ते राजीनामा देणार याची मलाही कल्पना नव्हती. ही सगळी चर्चा त्यांच्या घरात झाली. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना माहित असणार. मी त्यावेळी सुप्रिया सुळेंना विचारलं की राजीनाम्याचं तुम्ही काही सांगितलंच नाही. तर त्या म्हणाल्या अजित पवारांना माहित होतं. पंधरा दिवस चर्चा सुरु होती असंही त्यांनी मला सांगितलं. मी त्या चर्चांमध्ये नव्हतो. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत हे सगळं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis was alerted by sharad pawar that statement said minister chhagan bhujbal scj

First published on: 11-10-2023 at 19:01 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा