Sanotosh Deshmukh Murder Case Updates: बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जानेवारीच्या सुरुवातीला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही असे प्रतिपादन केले होते आणि या प्रकरणाचे राजकारण करू इच्छित नसल्याचे म्हटले होते.

संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. जर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला नाही तर सभागृहाचे कामकाज रोखतील, असा इशारा आज विरोधकांनी दिला होता.

सरकार बरखास्त करण्याची गरज

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “मंत्रिपदाचा राजीनामा पुरेसा नाही. सरकार बरखास्त करण्याची गरज आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.”

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी अद्याप फरार आहे. २७ फेब्रुवारी रोजी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बीड जिल्हा न्यायालयात सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र सादर केले, ज्यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा आणि त्यासंबंधित दोन प्रकरणांचा समावेश आहे. बीडमधील केज पोलिस ठाण्यात सरपंच देशमुख यांची हत्या, आवदा कंपनीला खंडणी मागण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde cabinet minister resigns beed sarpanch murder aam