Dhananjay Munde Resignation: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. देशमुख यांची हत्या होऊन आता ५१ दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुरावे सादर केले असल्याचा दावा केला होता. तसेच आज धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर गेले असल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा होती. यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत असताना धनंजय मुंडे राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा. मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी दोषी आहे की नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगू शकतील. ५१ दिवसांपासून मला लक्ष्य केले जात आहे.” नैतिकतेच्या मुद्द्यावर स्वतःहून राजीनामा देणार का? असा प्रश्नही यावेळी मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर मुंडे म्हणाले, “माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत प्रामाणिक आहे. मी जे बोलतो, ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो. मी नैतिकदृष्ट्या दोषी नाही, असे मला वाटते. जर दोषी असेल तर माझे वरिष्ठ मला तसे सांगतील.”

मी मंत्री असते तर राजीनामा दिला असता – सुप्रिया सुळे

नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “आमच्या सरकारच्या काळात अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ यांना केवळ ऐकीव माहितीवर अटक केली होती. वर्ष-वर्ष ते तुरुंगात होते. आतातर सत्तेत असलेले आमदारही टीव्हीवर रोज पुरावे देत असतानाही राजीनामा दिला जात नाही. माझ्यामुळे जर ५० दिवस पक्षाची रोज बदनामी होत असती तर मी स्वतःहून राजीनामा दिला असता. मी पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका घेतली नसती.

दरम्यान बीड विधानसभेचे आमदार आणि एकेकाळचे धनंजय मुंडे सहकारी संदीप क्षीरसागर यांनी दावा केला की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. संदीप क्षीरसागर यांनी याबद्दल एक्सवर पोस्ट टाकली. त्यात ते म्हणाले, “वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे खास आहेत. त्यामुळे राजीनामा अशक्य आहे. अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी राजीनामा अशक्य आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde open up about resignation from the ministerial post says if cm and dcm wants kvg