सातारा : मुंबई पुण्यातील चाकरमानी दिवाळी सणासाठी गावाकडे आणि कोकणात निघाल्याने पुणे बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मोठ्या संख्येने गाड्या रस्त्यावर आल्याने आणि सर्वांनाच पुढे जायची घाई असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. दिवाळीच्या सलग सुट्या व महामार्ग रस्त्यावर वाहनांच्या गर्दी मुळे पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहनधारक व प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आज महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शाम गोरड व भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व वाहतूक पोलिसांनी सकाळपासून बंदोबस्त ठेवून, हा मार्ग सुरळीत करण्यास मदत केली. मात्र रस्त्यावर वाहनांची संख्या सर्वाधिक असल्याने ही वाहतूक कोंडी अद्याप सुरूच आहे. त्यातच वाहन चालक आडवी तिडवी गाडी मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने अपघाताचे प्रसंग ओढवत आहेत. त्यातून वादावादीही होत आहे. एसटीसाठी ही प्रवाशांची मोठी गर्दी आहे.

सलग सुटी व दिवाळी सण जवळ आल्याने अनेक चाकरमानी आपल्या गावी आणि कोकणाकडे निघाल्याने पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या बाजूकडे वाहनांची संख्या फार मोठी आहे,तर साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहनांची संख्या सर्वाधिक वाढल्याने दोन्ही बाजूकडून खंबाटकी घाटातील वाहतूक अगदी धिम्या गतीने सुरू राहिली.

भुईंज व खंडाळा वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. यामुळे कोठेही अपघात झाला नाही. दरम्यान आज सकाळी घाट रस्त्यावर दत्त मंदिराजवळ किरकोळ अपघाताचे कारण होऊन ही वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली होती. हा अपवाद वगळता कोणताही अपघात झाली नाही. मात्र वाहतूक कोंडी दिवसभर व सांयकाळी उशिरापर्यंत सुरूच आहे.

घाटरस्त्यावर तीव्र चढ आणि कोंडीमुळे वाहनांचे इंजिन तापून वाहने बंद पडत आहेत. सातारा कोल्हापूर रस्त्यावरही वाहतूक कोंडी सुरूच आहे. साताऱ्यापासून पुढे अतित काशीळ माजगाव परिसरातही मोठी वाहतूक कोंडी आहे. आणेवाडी टोल नाक्यावर मोठ्या रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. कोकणात जाणाऱ्या वाहन चालकांनी वाई पाचगणी महाबळेश्वर मार्गे महाड या रस्त्याने जाणे पसंत केले आहे. त्यामुळे पाचगणी घाटातही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

महामार्गावर रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यातच वाहतूक कोंडी यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.