Eknath Shinde Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray: मंबई महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. अशात आज राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पुन्हा एकत्र येण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान ठाकरे बंधूंच्या या सांभाव्य युतीवर प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापल्याचे पाहायला मिळाले.
एकनाथ शिंदे संतापले
दरम्यान आज राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वत्र ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे. यावरूनच माध्यमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांबाबत विचारले असता, ते संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी प्रश्न करणाऱ्या पत्रकाराकडे हात करत, “जाऊदे, काहीतरी कामाचे बोला” असे म्हटल्याचे ऐकू येत आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना, ते आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का? असा थेट प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही.”
उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद
राज यांच्या एकत्र येण्याच्या विधानानंतर उद्धव ठाकरे यांनीही याला सकारात्म प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. पण माझी अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसभेवेळी सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा,आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही, हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा.”