परभणी:अपघात झाल्याचे बनावटरित्या भासवून लाखो रूपयांचा मुद्देमाल लंपास करत ८८ लाख १७ हजार रूपयांची अफरातफर करून स्वतःच जिंतूर पोलिसात अपघाताची खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी जिंतूर पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेणीवाल यांच्या मार्गदर्शनात अत्यंत सखोल तपास करून तांत्रिक माहितीच्या आधारे लाखो रूपयांची ही अफरातफर उघड करीत वाहनचालक व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल ६५ लाख ३९ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले.

वाहनचालकाने वाहनाचा बनावट अपघात करून वाहनातील ८८ लाख १७ हजार रूपयांचे विदेशी दारूचे बॉक्स लंपास केल्या प्रकरणी जिंतूर पोलिसात ३१ ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभाकर विश्वनाथ घुगे व त्याचा मुलगा अनिल प्रभाकर घुगे यांनी त्यांचा ट्रक क्र.एमएच १५ जीव्ही १७३५ नाशिक येथील सिंड्राम कंपनीतील सुमारे १ कोटी ३८ लाख रूपयांची विदेशी दारू बॉक्स नांदेड येथील अल्का वॉईनशॉप येथे पोहचविण्यासाठी घेतली. विदेशी दारूचे बॉक्स ट्रकमध्ये भरून नांदेडच्या दिशेने निघाले असता रस्त्यातच इतर साथीदारांच्या मदतीने बनावट अपघात करून ८८ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल अफरातफर करून हडप केला व अपघातातील दारू बॉक्स स्थानिक लोकांनी काढून नेल्याचा बनाव करत जिंतूर पोलिसात अपघात झाल्याची तक्रार दिली.

या प्रकरणी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेणीवाल यांच्याकडे तपास दिला. बेणीवाल यांनी घटनास्थळाची पाहणी करून सखोल तपास अंती अपघाताची ही घटना बनाव असल्याचे उघड केले. व पोलिस अधिक्षकांच्या सुचनेवरून मुख्य आरोपी प्रभाकर विश्वनाथ घुगे यास पुणे परिसरातील सिक्रापूर येथून ताब्यात घेतले.

चौकशीत घुगे याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी बेणीवाल यांनी घटनेचा सखोल तांत्रिक अभ्यास करून अफरातफर करून लंपास केलेले दारूचे बॉक्स शोधून काढले. या कामी मुख्य आरोपीस मदत करणार्‍या अनिल शिवाजी चव्हाण (वय ३२) रा.एसबीआय बँकेजवळ मंठा, रविंद्र हरिभाऊ पवार (वय ३०) रा.डांबरी ता.जालना व सचिन अशोक सोळंके (वय ३५) रा.तुळजा भवानीनगर वाटूर, ता.परतूर या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ६५ लाख ३९ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.