महाविकास आघाडीला सुरूंग लावत भाजपाने सत्ता उलथवून लावली. शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि त्यांच्या काही आमदारांना सोबत घेऊन भाजपाने महायुतीचं नवं सरकार स्थापन केलं. या बंडाला आता जवळपास २ वर्षे पूर्ण होतील. एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी ठरल्यानंतर अजित पवारांनीही राष्ट्रवादीत दुसरा गट स्थापून भाजपाला समर्थन दिलं. एकनाथ शिंदेंच्या साथीने सरकार सुरळीत चालू असतानाही भाजपाला अजित पवारांची गरज का लागली? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ते टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

बच्चू कडू यांनी सुरुवातीला महायुतीतील जागावाटपावर भाष्य केलं. ते म्हणाले, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नांदेडच्या जागा बदलल्या. नाहीतर अधिक जागा वाढल्या असत्या. शिवसेनेच्या जागेवर भाजपाने सर्व्हे केला. शिंदेंचा उमेदवार भाजपाने ठरवला. उमेदवार शिंदेंचे आणि भाजपा सर्वे करणार. ही नवीनच पद्धत आहे. हे म्हणजे नाक दाबून बुक्क्यांचा मार आहे.

ते पुढे म्हणाले, “अजितदादांबरोबरही असंच झालंय. दोन उसने उमेदवार त्यांना दिले. असा युती धर्म असतो का? एकनाथ शिंदेंच्या साथीने युतीचं सरकार सुरळीत चालू होता. परंतु, शिंदेंना शह देण्याकरता तुम्ही अजित दादांना घेतलं आणि अजित दादांना हाती घेऊन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न केला. अधिकचं राजकारण लोकांना पटत नाही.”

हेही वाचा >> “पराभवाचा कट हा युवा स्वाभीमानी पक्षाचाच”, बच्चू कडू यांचं रवी राणांना प्रत्युत्तर; म्हणाले, “नवनीत राणांनी सुनावलं म्हणून…”

बच्चू कडू लढवणार विधानसभेची निवडणूक

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही बच्चू कडू महायुतीची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभेत बच्चू कडूंनी २० जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  संपूर्ण महाराष्ट्रातल्या २० जागांवर निवडणूक लढवू, अशी माहितीही बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. तसंच, पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मला मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा >> बच्चू कडू महायुतीची साथ सोडणार? आगामी विधानसभा निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा; म्हणाले…

नवणीत राणांचा पराभव स्वाभीमानी पक्षामुळे

“खरं तर नवनीत राणा यांच्या पराभवाचा कट हा युवा स्वाभीमानी पक्षाचा आहे. नवनीत राणा जेव्हा खासदार होत्या, तेव्हा रवी राणा हे कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे अंतर्गत कलहामुळे त्यांचा पराभव झाला. आमचा काहीही वाद नाही. रवी राणा यांनी फक्त तोंड सांभाळलं असतं तरी नवनीत राणा निवडून आल्या असत्या”, अशी टीकाही बच्चू कडू यांनी काल (१७ जून) केली. तसेच मातोश्रीवरून रसद पुरवल्याच्या आरोपावर बोलाताना या विरोधात दोन दिवसांत न्यायालयात जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.