पश्चिम विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेने लहान-मध्यम शेतकरी रडकुंडीला आला आहे. या वर्षीच्या पावसाळ्याची सुरुवात काही भागांत सरासरीपेक्षा कमी, तर काही भागांत सरासरीइतक्या पावसाने झाली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पश्चिम विदर्भाचा बहुतेक भाग अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडला. तरारून येत असलेली खरीप पिके वाहून गेली. सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश अशी ओळख झालेल्या या भागात शेतीचे अर्थकारण बिघडलेच आहे. त्याचे भयावह परिणाम समोर येण्याची भीती आहे.
पश्चिम विदर्भ म्हणजेच अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत पावसाची सरासरी ७३२ मिलिमीटर इतकी असताना आतापर्यंत ८०९ मिमी म्हणजे सरासरीच्या ११० टक्के पाऊस पडला आहे. काही भागांत हजारो हेक्टर शेतजमीनच खरडून गेली आहे. पीक वाहून जात असल्याचे दृश्य शेतकऱ्यांना हतबलतेने पाहावे लागले. शेतकऱ्यांचा हा आक्रोश केवळ पाण्यात बुडालेल्या शिवाराचा नाही, तर भविष्यातील आयुष्याचा आहे. खरीप हंगाम बुडाला. आता रब्बी हंगामासाठी पैसा-अडका कुठून आणावा, ही चिंता आहे.
बुलढाणा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांतील निम्मे शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ३.०३ लाख तर यवतमाळ जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. याचा थेट परिणाम हा शेती उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बुलढाण्यात ६७५ मिमी (१०५ टक्के) तर यवतमाळ जिल्ह्यात ९८० मिमी (१२४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
२०२४ च्या खरीप हंगामातही अमरावती विभागात अतिपावसामुळे २ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात सर्वाधिक हानी झाली होती. वातावरणातील बदलांचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणावर बसतोय. शेतीत आधी भांडवल आणि श्रमाची गुंतवणूक करावी लागते. शेतमालाचे भाव कोसळले, तर शिल्लक काही उरत नाही. पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. सरकारने अमरावती विभागासाठी ५६५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, पण ती अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी आत्महत्यांचे संकट
अमरावती विभागात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत ७०७ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक २३४ आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात १२२ शेतकऱ्यांनी परिस्थितीला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्टमध्ये ४४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या विभागात २००१ पासून तब्बल २१ हजार ८५४ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. ही संख्या सुन्न करणारी आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून पश्चिम विदर्भात सातत्याने कधी कमी पर्जन्यमान तर कधी अतिवृष्टीचा जोर असल्याने शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पन्न येत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चाललाय.
mohan.atalkar@expressindia.com