Devendra Fadnavis on Supriya Sule: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यात आणि देशातही अशा प्रकारच्या घटना घडल्याचा मुद्दा आज सामना अग्रलेखातूनही उपस्थित करण्यात आला आहे. त्यात दुसरीकडे संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी बिष्णोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राज्यात निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीवर आणि संजय राऊतांना आलेल्या धमकीबाबत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात दंगली होणं ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे. मी खासदार संजय राऊत यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

“मी बोललो तर भूकंप होईल”, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत संजय राऊतांचा सूचक इशारा; ‘त्या’ प्रकरणाचा केला उल्लेख!

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांनी त्यावर खोचक प्रत्युत्तर दिलं. “मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. अनेकांना मनातून असं वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल. मी त्या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार दिला आहे. जे जे चुकीचं काम करतील, त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पद पाच वर्षं मी सांभाळलं आहे. यापुढेही जे लोक अवैध काम करतील, त्यांना मी सोडणार नाही”, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

“मी कुणालाही घाबरत नाही”

“जे जे लोक चुकीचं काम करतील, त्यांच्यावर १०० टक्के कारवाई होईल. मी आजही सांगतो, मी कुणाला घाबरत नाही, कुणाला दबत नाही. जे कायदेशीर आहे तेच वागतो. कायद्यानंच राज्य चालेल”, असंही फडणवीस म्हणाले.

“गृहमंत्रालय झेपत नसेल तर फडणवीसांनी…” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, “मी स्वतः अमित शाहांशी बोलणार”

“संजय राऊत धमकी प्रकरणी कारवाई होईल”

“संजय राऊतांना धमकी देणाऱ्या माणसाची ओळख पटली आहे. प्राथमिक माहितीनुसार दारुच्या नशेत त्यानं अशी धमकी दिल्याचं समोर आलं आहे. पण ही प्राथमिक माहिती आहे. याबाबत संपूर्ण तपास केला जाईल आणि कुणीही धमकी दिली असेल तर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणीही कुणाला धमकी दिली, तरी सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत. अशा कोणत्याही व्यक्तीवर कारवाई होईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister devendra fadnavis mocks ncp supriya sule on sanjay raut threat message pmw
First published on: 01-04-2023 at 12:46 IST