कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लोकांना भेटल्यानंतर हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांनी इंडिया आघाडीला मत देणार असल्याचं सांगितलं आहे. इतरांची पसंती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला आहे. ही स्थिती पाहता आता तर शरद पवार यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर केली आहे.
जनमत हे भाजपकडे झुकत चालले आहे. लोकसभा निवडणूक जवळ येईल तशी त्यामध्ये वाढ होत जाईल. समाज माध्यमात विरोधक जाणीवपूर्वक भाजप विरोधात वातावरण निर्माण करत आहेत. पण त्याची आम्हाला फिकीर नाही, असेही बावनकुळे म्हणाले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार पुढे मुख्यमंत्री होतील, असे म्हटले असले तरी त्याची मला अचूक कल्पना नाही. पण प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. तथापि आमच्या केंद्रीय समितीने सांगितले तर पुढेही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असेही बावनकुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
हेही वाचा : वैद्यकीय महाविद्यालयांच्या औषध खरेदीसाठी ६० कोटींची तरतूद वापर केवळ २५ कोटींचा!
शरद पवार यांनी पूर्वी नरेंद्र मोदी यांना बारामतीला निमंत्रित केले होते. तथापि त्याचा पवार यांना फारसा उपयोग झाला नव्हता. आता राहुल गांधी यांना बारामतीला आणले तरीही त्याचा उपयोग होणार नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्याला काहीच दिले नाही. याउलट एकनाथ शिंदे हे देत असल्याने शिवसेनेचे नेते त्यांच्याबरोबर राहतील, असे निरीक्षण बावनकुळे यांनी नोंदवले.
हेही वाचा : “एकनाथ शिंदेच पुढं मुख्यमंत्री राहावेत, तर देवेंद्र फडणवीसांनी…”, शिंदे गटातील नेत्याचं मोठं विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य असल्याचे अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यांनी दिलेले समर्थन महत्त्वाचे असल्याने अजित पवार आमच्या सोबत आले आहेत, असा खुलासाही बावनकुळे यांनी केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडी कारवाई कुठपर्यंत आली हे माहित नाही. पण ती मागे घेतलेली नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, केशव उपाध्ये, विजय जाधव, समरजित घाटगे, अमल महाडिक उपस्थित होते.