एकनाथ शिंदे यांनीच पुढं मुख्यमंत्री राहावं. तर, देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात. फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावं, असं विधान शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा, असंही शिरसाट यांनी म्हटलं. ते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावर बोलत होते.
बावनकुळे काय म्हणाले?
“प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. भाजपाच्या नेत्यांना वाटतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. पण, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार, असं केंद्रीय समितीनं सांगितलं, तर आम्हाला काम करावे लागेल,” असं बावनकुळेंनी म्हटलं होतं.
हेही वाचा : निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ चिन्ह गोठवणार? कायदेतज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले…
“अजित पवारांचेही कार्यकर्ते मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावतात, पण…”
यावर ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले, “पक्षाचा कार्यकर्ता आपल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छितो. अजित पवारांचेही कार्यकर्ते मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावतात. पण, एकनाथ शिंदे यांनीच पुढं मुख्यमंत्री राहावं, ही माझी इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात. फडणवीसांनी केंद्रात आपलं नेतृत्व करावं.”
“‘ती’ धमक फडणवीसांमध्ये”
“यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सर्वांनी केंद्रात आपली धमक दाखवली आहे. ती धमक दाखवण्याची क्षमता देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे. भविष्य सांगता येत नाही. मात्र, फडणवीसही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील,” असं संजय शिरसाटांनी म्हटलं.
हेही वाचा : मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर असल्यानं नाराजीच्या चर्चा, अजित पवारांनी सोडलं मौन; म्हणाले, “आरे बाबा…”
“हा नशिबाचा खेळ”
“अजित पवारांनाही मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा आहेत. राजकारणात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. पण, हा नशिबाचा खेळ आहे,” असं संजय शिरसाटांनी सांगितलं.