सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने गमावल्याच्या पार्श्वभूमीवर यापैकी सोलापूर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी बोलावलेल्या पक्षाच्या चिंतन बैठकीत पक्षाचे निरीक्षक तथा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी सवाल उपस्थित करून गोंधळ घातला. त्यामुळे ही बैठक गाजली.

शनिवारी, दुपारी शांतिसागर मंगल कार्यालयात पक्षाचे निरीक्षक, खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या उपस्थितीत ही चिंतन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या पराभवाची कारणे शोधून त्याबाबतचा अहवाल निरीक्षक महाडिक हे प्रदेश पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत. त्यादृष्टीने ही बैठक महत्वाची असूनही सोलापूर मतदारसंघातील पक्षाच्या चारपैकी तीन आमदार गैरहजर राहिले. सोलापूर शहर उत्तर विधानसभा क्षेत्रातून पक्षाला ३५ हजार ९२७ मतांची आघाडी मिळवून देणारे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह पक्षाला ९४३६ मतांची पिछाडी मिळालेल्या दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख आणि तब्बल ४५ हजार ४२० मतांची पीछाडी मिळादाल्या पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे या तिघा आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरविली होती. एवढेच नव्हे तर पराभूत झालेले पक्षाचे उमेदवार राम सातपुते हेदेखील या बैठकीला गैरहजर राहिले.

हेही वाचा : लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी त्यांना…”

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठी प्रचार यंत्रणा राबवून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय रस्ते विकास व परिवहनमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका होऊनसुध्दा पक्षाचे उमेदवार राम सातपुते हे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याकडून ७४ हजार १९७ मतांच्या पिछाडीने पराभूत झाले होते. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीत पक्षाचे निरीक्षक, खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे लागले.

हेही वाचा : “ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही”, सरकारकडून आश्वासन मिळल्यानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित!

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ तालुक्यात टाकळी सिकंदर येथे अनेक वर्षांपासून खासदार धनंजय महाडिक यांच्या अधिपत्याखाली भीमा सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे. परंतु याच कारखान्याच्या उपाध्यक्षासह इतर संचालकांनी भाजपच्या विरोधात, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना साथ दिली. भीमा साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या मोहोळसह पंढरपूर, मंगळवेढा भागातून प्रणिती शिंदे यांना सर्वाधिक एक लाख ८५६२ मतांची आघाडी मिळाली आहे. त्याबद्दल या बैठकीत निरीक्षक धनंजय महाडिक यांना सवाल करून गोंधळ घालण्यात आला. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्रीमंत बंडगर यांच्यासह विकास वाघमारे, सुदर्शन यादव, यतिराज होनमाने आदी कार्यकर्त्यांनी जाब विचारल्याने खासदार धनंजय महाडिक हे अस्वस्थ झाले होते. शेवटी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केले.