Islampur Renamed as Ishwarpur says Chandrashekhar Bawankule : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (वाळवा तालुका) या शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’, असे करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र शासनास सादर करण्यात आला होता. त्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता इस्लामपूर शहर व नगर परिषदेचं नाव अधिकृतरित्या ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे. राज्य सरकारने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखरन बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आता निर्णय घेतला आहे. आज केंद्रीय गृहमंत्रालय व महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घतला आहे.”

बावनकुळेंनी मानले अमित शाह व फडणवीसांचे आभार

महसूलमंत्री म्हणाले, “या निर्णयाबद्दल मी अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. इस्लामपूर शहर व इस्लामपूर नगर परिषदेचं नाव आता ईश्वरपूर असं झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील जनतेची मागणी मान्य झाली आहे. आरएसएससह गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केली होती. ती मागणी आता पूर्ण झाली आहे. आजपासून इस्लामपूर नगर परिषदेला ईश्वरपूर असं नाव देण्यात आलं असून यासंदर्भात शासन निर्णय जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारची मान्यता

गाव किंवा शहरांची नावं बदलण्याबाबतचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. या प्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारसीसह सादर करण्यात आला होता. केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचे नामांतर ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे.

पाच दशकांपासूनची मागणी मान्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी ७० च्या दशकात शहराचं नामकरण ईश्वरपूर असं करावे, अशी पहिल्यांदा मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर १९८६ मध्ये इस्लामपूर येथील जाहीर सभेत “हे इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर आहे, या शहराचा असाच उल्लेख केला पाहिजे”, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपा नेते अण्णा डांगे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांनी देखील हीच मागणी लावून धरली होती.