सांगली : आमच्यातील काही मंडळी तिकडे गेली. यामागे खासदार विशाल पाटील यांचा सल्लाच महत्त्वाचा ठरला असावा, कारण ते कधी काय करतील याचा नेम नाही, असे मत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.सांगलीवाडी येथे महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार पाटील, आमदार सुहास बाबर, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, पृथ्वीराज पाटील, संजय बजाज आदी उपस्थित होते. राजकीय चिमटे काढत असताना मंत्री गोरे यांनी आमदार जयंत पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर आवाहनही केले.

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, भाजपमध्ये ज्यांचे चालते ते देशपांडे हे माझे मित्र आहेत. त्यामुळे गेलेले लोक माझ्यापासून फार दूर जाऊ शकत नाहीत. राजकीय क्षेत्रात खासदार पाटील हे काय भूमिका घेतील याचा नेम नसतो. कदाचित त्यांनीच काही मंडळींना भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला असावा. सांगलीवाडीचे लोक हुशार आहेत, ते कधीच होडी पलटू देत नाहीत. मात्र, होडीत गर्दी असेल तर काठावरच राहणे शहाणपणाचे आणि सुरक्षित असते.

यावर बोलताना मंत्री गोरे म्हणाले, सांगली विधानसभा क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे नेते भाजपमध्ये आहेत. यामुळे विधानसभेच्या पुढील निवडणुकीत उमेदवार कोण याची चिंता कुणी बाळगू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंबीर आहेत. भाजप समुद्रासारखा पक्ष आहे, यामध्ये कुणीही आले तर चालते. आता जयंत पाटील यांनीच भाजपमध्ये यावे असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आणि मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर या पाठोपाठ कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर खासदार पाटील म्हणाले हरिदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात आहेत. मात्र आज भाजपचे मंत्री गोरे उपस्थित आहेत. त्यांची सर्व पक्षात मैत्री आहे. यावरुन जयंत पाटील यांनी खासदारांवर निशाणा साधला.