उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी (ता.५ एप्रिल) इंदापूरमध्ये सभा पार पडली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची लढाई ही पवार विरुद्ध पवार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे विधान केले होते. आता देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस याचे हे विधान हास्यास्पद आहे. ही लढाई कोणाच्या विरोधात आहे, हे बारामतीकरांना माहिती आहे. बारामतीकर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्याच पद्धतीने देतील. मात्र, यामध्ये नरेटिव्ह बदलण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. कदाचित सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना समोर आली असेल. त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न असेल”, असे जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा : ठाण्यात महायुतीतील तिढा संपला? दीपक केसरकरांचं सूचक विधान, म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात…”

हसन मुश्रीफ यांच्या विधानार टीका

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी एका सभेत बोलताना हेलिकॉप्टरने मतदार आणू, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “हेलिकॉप्टरने मतदार आणू म्हणजे मतदारांची सर्व व्यवस्था करायची ठरवलेली दिसते आहे. आमच्या विरोधकांकडे भरपूर घबाड असल्याचे दिसते आहे. त्यामुळे मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी असावी. आमचे विरोधक पैशाने किती गब्बर आहेत, हे यावरुन दिसते. आम्ही जनतेच्या जिवावर निवडणुकांना सामोरे जात आहोत. मला विश्वास आहे, महाराष्ट्राची जनता याचा विचार नक्की करेल”, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.

‘वंचित’बाबत जयंत पाटील काय म्हणाले?

बारामती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले, “वंचितने बारामतीत आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्याबाबत त्यांचे आभार मानले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी इतर काही जागांवरही सहकार्य करावे”, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.