सातारा : प्रत्येकजण आपापला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यानुसार मंत्री जयकुमार गोरे त्यांचा पक्ष वाढवत आहेत. मी माझा पक्ष वाढवतोय. वाईचे मतदार मला नेहमीच वाढीव मताधिक्याने निवडून आणतात. मी दोन, तीन हजारांनी निवडून आलेलो नाही, असा खोचक टोला मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरे यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

नियोजन भवनात पालकमंत्री शंभूराज देसाई व मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. जिल्ह्यात सध्या महायुतीच्या नेत्यांत एक दुसऱ्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी एकमेकांच्या मतदारसंघात राजकीय कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतयुद्ध सुरू झाले आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांनी मकरंद पाटील यांच्या वाई, खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघात कार्यक्रमादरम्यान मंत्री मकरंद पाटील त्यांचे नाव न घेता केली होती टीका. कोणीही बाभळीच्या झाडाखाली उभे राहत नाही, त्याला आंब्याची सावली लागते. बावधन गावाची ताकद राजकारण बदलविण्याची असून, आजची सभा ही परिवर्तनाची आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.

आज रविवारी मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून माण विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माणचे नेते अनिल देसाई यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर मकरंद पाटील यांना पत्रकारांनी डिवचले असता ते म्हणाले, जयकुमार गोरे यांचा पक्ष वाढवत आहेत. मी माझा पक्ष वाढवतोय. वाई मतदारसंघात मला कायमच वाढीव मतदान मिळालंय. मी दोन, तीन हजाराने कधीही निवडून आलेलो नाही, असा टोला त्यांनी लगावला.

माझ्या माण खटावला दुष्काळी म्हणण्याची कोणी हिंमत करणार नाही, असे ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे म्हणत असताना तुम्ही माण खटावचा उल्लेख दुष्काळी असा केला. जयकुमार गोरे हे मकरंद पाटील यांच्या वाई मतदारसंघात गेले असता, खंडाळ्याला चांगले नेतृत्व मिळाले असते, तर आणखी चांगला विकास झाला असता असे वक्तव्य त्यांनी केले होते. याबाबत विचारले असता मकरंद पाटील म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.

ते त्यांचा पक्ष वाढवत असून, मी माझा पक्ष वाढवत आहे. मतदार मला प्रत्येक वेळी उच्चांकी मतदान करतात. हे त्यांना माहीत नसेल. मी दोन तीन हजार मताने कधीही निवडून आलो नाही. कायम उच्चांकी मतांनी निवडून आलो आहे, असा उपरोधिक टोलाही पाटील यांनी गोरे यांना लगावला. वाई मतदार संघाचे राजकारण आणि मतदार कोणाला कधीही कळणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.