सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष आता समोर आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळमधील सहा भाजप नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले आहे. या नगरसेवकांवर शिवसेना दरबारात वावरत असल्याचा आणि पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे महायुतीमधील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नारायण राणे भाजपचे निर्णय घेतात, त्यामुळे खासदार राणे यांची भूमिका महत्त्वाची आहे असे त्यांनी सांगितले.
भाजपने कुडाळ नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांना निलंबित केले आहे. या नगरसेवकांमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नयना मांजरेकर आणि चांदणी कांबळी यांचा समावेश आहे. हे सर्व नगरसेवक गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नव्हते, असे प्रभाकर सावंत यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. पक्षाने वारंवार सूचना देऊनही त्यांनी सहकार्य केले नाही, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या सहा नगरसेवकांसह संध्या तेरसे आणि रामचंद्र परब या दोन नगरसेवकांनी ‘सिद्धिविनायक नगर विकास आघाडी’ हा गट स्थापन केला होता. मात्र, संध्या तेरसे आणि रामचंद्र परब हे पक्षाच्या धोरणांनुसार काम करत असल्यामुळे त्यांना गटातून वगळण्यात यावे, अशी मागणीही सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. भाजपच्या इतिहासात एकाच वेळी सहा नगरसेवकांना निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
निलंबनाच्या कारवाईला आमदार निलेश राणेंचा विरोध
या निलंबनावर कुडाळ-मालवणचे शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “या पत्राला आम्ही किंमत देत नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. आमदार राणे यांच्या म्हणण्यानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे सर्व निर्णय खासदार नारायण राणे घेतात. जोपर्यंत नारायण राणे सांगत नाहीत, तोपर्यंत हे निलंबन मान्य केले जाणार नाही असे म्हटले आहे.
आमदार निलेश राणे यांनी थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एका बाजूला भाजप जिल्हाध्यक्ष पक्षशिस्त मोडल्यामुळे कारवाई करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आमदार निलेश राणे या कारवाईलाच विरोध करत आहेत. यामुळे भविष्यात भाजपची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हे सहा नगरसेवक शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या जवळ गेल्याने, भाजपने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई केली. या घटनेमुळे कुडाळ नगरपंचायतीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.