रत्नागिरी – कोकणातील तिन्ही जिल्ह्यात बिबट्यांनी चांगलीच दहशत माजविण्यास सुरुवात केली आहे. वारंवार बिबटे नागरी वस्तीत दिसू लागल्याने नागरिक भितीच्या छायेत वावरत आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात बिबटे वाढल्याने वन विभागाची देखील कामगिरी वाढली आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राण्यांनी नागरी वस्तीत शिरुन हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघ, ब्लैक पॅथर , बिबटे, रानटी हत्ती व गवा रेडे मोठ्या प्रमाणात दिसून येवू लागले आहेत. मात्र यातील बिबटे राजरोस नागरी वस्तीत फिरत असल्याने नागरिकांमध्ये चांगलेच भितिचे वातावरण तयार झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर, लांजा, संगमेश्वर , रत्नागिरी व चिपळूण तालुक्यांच्या भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर वाढला आहे. जिल्ह्यात वन विभागाच्या सर्व्हे नुसार चार वाघ व सहा ब्लैक पॅथर असल्याची नोंद आहे.

मात्र जिल्ह्यात बिबट्यांची संख्या किती आहे? याचा अधिकृत आकडा वन विभागाला ही देता येत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्यांची मोठी संख्या असावी असा अंदाज लावला जात आहे. जिल्ह्यात बिबट्या नागरी वस्तीत सापडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने याकडे वन विभाग देखील लक्ष ठेवून आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर असुर्दे येथे नुकतेच बिबट्याचे मृत पिल्लू सापडले. तसेच रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे बिबट्या वस्तीत असलेल्या विहिरी पडलेला आढळला. गणपतीपूळे येथे देखील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने वाचविले.

संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे एका घराच्या मागील बाजुला जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्याला पकडण्यात आले होते. तसेच संगमेश्वर धामणी व शहर परिसरात बिबट्या फिरत असल्याने येथील नागरिक आज ही भितिच्या छायेत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी खुर्द गावनवाडी येथे कुत्र्याचा पाठलाग करत आलेला बिबट्या एका घराच्या बाथरूममध्ये अडकून पडला होता. तुरळ सांगडेवाडी येथे मधुकर चव्हाण यांचे राहत्या घराचे मागे असलेल्या कोंबड्याच्या पोल्ट्री मध्ये बिबट्या शिरला होता.

रत्नागिरी येथील परिवहन अधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळ मुंबईकडून मडगावच्या दिशेने जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेसची धडक बसून बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. राजापुर व लांजा भागात सरास बिबट्या फिरताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. रात्री अपरात्री हे बिबटे मुंबई गोवा महामार्गावर फिरत असल्याचे आढळून आले आहेत. राजापुर भागातील पाचल , राजापुर शहर व परिसरात बिबट्यांनी दुचाकीस्वारांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ८२४८.८ भौगोलिक क्षेत्र असून, त्यापैकी ०.८ टक्के हेक्टरी एवढे वनक्षेत्र सरकारी वनक्षेत्र असून ते वन विभागाच्या ताब्यात आहे. मागील वर्षभरात वन विभागाच्या पथकाने २० ते ३० बिबट्यांना जीवदान दिले आहे. फासकीत किंवा विहिरीत पडलेल्या बिबट्यांची व्यवस्थित सुटका करुन आरोग्य तपासणी नंतर पुन्हा बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात महिन्यातून २ ते ४ वेळा बिबट्या आढळून आल्याच्या व हल्ला केल्याच्या घटना दिसून येत आहेत. यामुळे जिल्ह्यात बिबट्याची दहशत आजही कायम राहिली आहे.

जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असला तरी वन विभागाचे पथके तात्काळ यावर कार्यवाही करत आहेत. वाढलेल्या जंगल तोडीमुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत येत असल्याचे दिसत आहे. मात्र नागरिकांनी घाबरुन न जाता बिबट्या व अन्य वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे. – गिरिजा देसाई, वनाधिकारी.