Hanuman Chalisa Loudspeaker Row: मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली असून राज्यभरात मनसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ४ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार राज्यभरात अनेक ठिकाणी मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा लावत आंदोलन केलं जात आहे. दरम्यान काही ठिकाणी मशिदींनी भोंग्याचा वापर करणं टाळलं तर काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याची स्थिती पहायला मिळाली.
पोलिसांनी राज्यभरात मनसेच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून ताब्यात घेतलं आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान असणाऱ्या शिवतीर्थबाहेरील मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेताना झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली.
दरम्यान राज ठाकरे यांनी दुपारी १ च्या सुमारास पत्रकार परिषद घेत जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच हा सामाजिक विषय असून त्याला धार्मिक वळण दिलं तर आम्हीदेखील देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मशिदींवर भोंग्याचा वापर न करणाऱ्या मौलवींचे आभारदेखील मानले आहेत.
Raj Thackeray Loudspeaker Row: जोपर्यंत भोंग्यांचा विषय निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे.
नवी मुंबईत पोलिसांनी मनसेचे नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई सहसचिव नितीन लष्कर, विभाग अध्यक्ष भूषण आगिवले, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष दशरथ सुरवसे ऐरोली येथील जामा मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जमले असता मनसे पदाधिकाऱ्यांना रबाले पोलिसांनी ताब्यात घेतलं.
कल्याण डोंबिवलीतील ५० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास मनसेच्या २० ते २५ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
राज्यभरात १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर १३ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास दोन लाख अधिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या ८७ कंपन्या आणि ३० हजार गृहरक्षक सतर्क ठेवण्यात आले आहेत.