सातारा : महाबळेश्वर – तापोळा रस्त्यावर पुन्हा दरडींचा धोका आहे. नवीनच रस्त्याची पहिल्याच पावसात दुर्दशा झाली. महाबळेश्वर – तापोळा मुख्य रस्त्यावर चिखली शेडनजीक डोंगर वाहून आल्याने नवीन बांधलेला रस्ता वाहून गेला आहे. त्याठिकाणी तब्बल तीनशे फूट खोल दरी तयार झाली आहे. यामुळे या रस्त्यावर पुन्हा दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांमधून बांधकाम विभागासह ठेकेदाराच्या कामावर शंका उपस्थित होत आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर – तापोळा मुख्य रस्त्यावर रस्ता खचला व वाहून गेला. यामुळे तब्बल तीनशे फूट खोल दरी निर्माण झाली. नवीनच रस्त्याची पहिल्याच पावसात दैना झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने काम सुरू करण्यात आले. मात्र मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा याच ठिकाणी रस्त्याची पडझड झाली आहे. मुख्य तापोळा रस्त्यावरील चिखली शेड ते झोळखिंड हा परिसर खूप धोकादायक झाला आहे. महाबळेश्वर – तापोळा मुख्य रस्ते कामास राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी मिळाला. या निधीमधून काही महिन्यांपूर्वी कारवी आळा ते तापोळापर्यंतच्या डांबरी रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले होते. या भागात असणाऱ्या वन विभागाच्या हद्दीतील डोंगरावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्ता खचण्याचा प्रकार घडत आहे.
या प्रवाहात रस्ता पूर्णपणे दरीच्या दिशेने खचला व वाहून गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने तीन जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटविण्याचे काम करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून भिंत बांधण्याची कामे सुरू कारण्यात आली. जेसीबी व पोकलेनच्या मदतीने काम करताना पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग कोसळला आहे. त्यातच दरडी कोसळत आहेत. महिनाभराच्या पावसाने जमीन ठिसूळ झाली आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे ही कामे करणे जिकिरीचे झाले आहे. मोठ्या पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. त्यातूनच महाबळेश्वर-तापोळा मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत.
वन विभागाच्या हद्दीतील डोंगरावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत रस्त्यावर येत आहे. त्यामुळे महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावरील चिखली शेड ते झोळखिंड परिसरात डोंगर ठिसूळ असल्याने दररोज या परिसरात दरडी कोसळत आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कामात अडथळा होत आहे. – अजय देशपांडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.