Maharashtra Assembly Elections 2024 Dry Days : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज (सोमवारी, १८ नोव्हेंबर) संध्याकाळी ५ वाजता थंडावणार आहेत. बुधवारी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून शनिवारी मतमोजणी होईल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात नोव्हेंबर महिन्यातील काही दिवस ड्राय डे असतील. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मुंबईसह, अन्य शहरं व राज्यात दारूविक्री करता येणार नाही. यापूर्वी १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यात ड्राय डे घोषित करण्यात आला होता. तसेच आज सायंकाळी ६ वाजल्यानंतर मुंबईसह सर्व शहरांमध्ये मद्यविक्री करण्यास बंदी असेल. १९ नोव्हेंबर रोजी देखील ड्राय डे असेल. ही बंदी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू असेल. तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२० नोव्हेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंज बंद असेल. महाराष्ट्राच्या निवडणुकीमुळे देशातील दोन प्रमुख शेअर बाजार बंद असतील. या दिवशी इक्विटी, इक्विटी डेरिवेटिव्ह आणि एसएलबीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवसाय केला जाणार नाही.

हे ही वाचा >> पाकिस्तानशी संबंध बिघडण्याच्या भीतीने काँग्रेसकडून कायम ‘दहशतवाद’ पाठीशी; योगी आदित्यनाथ यांची घणाघाती टीका

प्रचारतोफा आज थंडावणार

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा केंद्रस्थानी राहिलेला विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावतील. प्रचार थांबल्यानंतर विविध पक्षांकडून होणाऱ्या छुप्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे लक्ष असेल.

आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराची पातळी यंदा फारच खालावल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदवण्यात आलं. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि प्रचाराची रंगत वाढत गेली. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विदर्भातलं वातावरण तापवलं. त्यापाठोपाठ राज्यातील प्रचाराची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला. मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या या दोन घोषणांभोवती प्रचाराची दिशा फिरू लागली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दोन घोषणांवरून भाजपावर हल्लाबोल केला. तर भाजपा व शिवसेनेने (शिंदे) या घोषणा उचलून धरल्या. भाजपाला देशाचे तुकडे करायचे आहेत, अशी टीका विरोधकांनी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ हैं’ या दोन घोषणांचा प्रचारसभांमध्ये समाचार घेतला. विशेष म्हणजे महायुतीचे घटक असले तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या घोषणेशी सहमत नसल्याचं जाहीर केलं. ‘बटेंगे आणि सेफ है’ या दोन घोषणांमुळे मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. दुसरीकडे, या घोषणांच्या आधारे विरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्यावर महाविकास आघाडीने भर दिला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly elections 2024 dry days in mumbai liquor shops will be closed for 4 days asc