Maharashtra Cabinet swearing-in Sudhir Mungantivar : गेल्या अनेक दिवसांपासून असलेला सत्ता स्थापनेचा तिढा अखेर शेवटच्या क्षणी सुटला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. तर, दोन उपमुख्यमंत्रीही राज्याला लाभणार आहेत. दरम्यान, उद्याच्या शपथविधीला कोण कोण शपथ घेणार, कोणाच्या पारड्यात कोणतं खातं पडणार याचीही उत्सुकता राज्यातील जनतेला आहे. यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२० नोव्हेंबरला मतदान होऊन २३ नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपाला १३२ जागा, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५५ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४० जागा मिळाल्याने महायुतीच राज्यात सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालं होतं. परंतु, मुख्यमंत्री पदावरून राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या पदासाठी अडून बसले होते, अशी चर्चा होती. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, आज भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्वांनी अनुमोदन दिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती झाली. तसंच, तेच आता मुख्यमंत्री असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्याच्या शपथविधीला ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तसंच, देवेंद्र फडणवीसांसह कोण कोण शपथ घेणार याचीही उत्सुकता आहे.

हेही वाचा >> Maharashtra Government Formation : ५०० हून अधिक पोलीस तर साडेतीन हजार कॉन्स्टेबल, शपथविधीसाठी पोलिसांचा ‘असा’ असेल बंदोबस्त!

याबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “कोणी शपथ घ्यावी याबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा केली जाईल, त्यानंतर संदेश आल्यावर शपथ घेतली जाईल. सध्या जे वातावरण आहे त्यानुसार मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या होईल. १६ डिसेंबरपासून नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी इतर मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम होईल.

उद्याच सर्वांचा शपथविधी व्हावा अशी आमदारांमध्ये चर्चा

शपथविधीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोरच आमदारांचा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा व्हायला हवा अशी चर्चा आहे. त्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “२८ नोव्हेंबर २०१९ मध्येही असाच शपथविधी झाला होता. त्यावेळीही फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतली होती.”

एकनाथ शिंदे नाराज आहेत का?

महायुतीच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज आहेत का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “ते फार आनंदी आहेत. ते कधीच नाराज होत नाही. जो माणूस आपल्या कपाळ्यावर टीळा लावतो तो कधीच नाराज होऊ शकत नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet swearing in sudhir mungantivar clear who will taking oath tomarrow sgk