छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याबरोबरच महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांकडून कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. असं असतानाच आता मराठवाडा विद्यापीठामधील सोहळ्यात कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केलेल्या नितीन गडकरींनीही या प्रकरणावर सूचक पद्धतीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री असलेल्या गडकरींच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ क्लीप शेअर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> “…म्हणून अशा शिवरायद्वेषी राज्यपालांना लगेच हटवा असे सांगण्याचे धाडस तुमच्यात नाही”; शिवसेनेचा भाजपा-शिंदेंना टोला

घडलं काय?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी (१९ नोव्हेंबर) मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं.

“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. सर्वच स्तरातून राज्यपालांच्या या विधानावर आक्षेप घेतला जात आहे. असं असतानाच आता गडकरींनी या प्रकरणावर सूचक विधान केलं आहे.

नक्की वाचा >> राज्यपाल कोश्यारींचं शिवारायांसंदर्भात वादग्रस्त विधान : “…म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात”; रोहित पवार संतापले

गडकरी काय म्हणाले?
ऑफिस ऑफ नितीन गडकरी म्हणजेच गडकरींच्या कार्यालयीन ट्विटर हॅण्डलवरुन एक ३० सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नितीन गडकरी अगदी भावनिक स्वरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना दिसत आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो! आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचं आदर्श आहे,” असं गडकरी या व्हिडीओमध्ये महाराजांबद्दलच्या भावना व्यक्त करताना म्हणतात.

नक्की वाचा >> “या राज्यपालांना राज्याच्या बाहेर पाठवा, इतका घाणेरडा…”; भगतसिंह कोश्यारींसंदर्भात संभाजीराजे छत्रपतींची मागणी

पुढे बोलताना शिवरायांचं गुणगाण गडकरींनी गायलं आहे. “यशवंत! कीर्तिवंत! वरदवंत! सामर्थ्यवंत! जाणता राजा!! निश्चयाचा महामेरु ! बहुत जनासी आधारू ! अखंडस्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी !!,” असं गडकरी अगदी हातवारे करुन म्हणतात. तसेच हसून त्यांनी, “डीएड-बीएड करणारा राजा नव्हता, वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता,” असंही महाराजांबद्दल म्हटलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी पदमुक्त करावे, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. तर वाट दाखविणारे आदर्श मानणार की वाट लावणारे, असा खोचक टोमणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना मारला आहे. काँग्रेसनेही राज्यातील अनेक ठिकाणी राज्यपालांच्या फोटोलो जोडो मारो आंदोलन केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra governor bhagat singh koshyari controversial statement on chatrapati shivaji maharaj nitin gadkari first comment scsg