Maharashtra Political News : राज्यातील महायुती सरकारमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. यावरूनच आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. तर दुसरीकडे अंजली दमानियांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदाराला बदडून काढण्याची धमकी दिली होती, असा एका किस्सा सांगितला. यासह दिवसभरातील महत्वाची पाच राजकीय विधाने नेमकं काय आहेत? ते जाणून घेऊयात.

“चला, आज परत कोणीतरी गावी जाणार”; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

शिवसेना (शिंदे) व भाजपात तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. आज (१८ नोव्हेंबर) मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे फक्त बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी पोस्ट लिहित एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांना चिमटे काढले आहेत. “असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडतात म्हणून! याला म्हणतात चोर मचाये शोर! पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत! कसा चाललाय हा कारभार?! महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला, आज परत कोणीतरी गावी जाणार”, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार? अजित पवार सांगितलं काय घडलं?

आज (१८ नोव्हेंबर) मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे. यावर अजित पवार म्हणाले की, “मला त्याबाबत काहीही माहिती नाही आणि मला ते जाणवलंही नाही. कारण आमचेही मकरंद (आबा) पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे नव्हते. हसन मुश्रीफही लवकर निघून गेले, कारण त्यांना पुढे जायचं होतं. त्यामुळे माझा असा समज झाला की आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अर्जांची छाननी आहे. त्यामुळे मंत्र्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला संख्या घटली असा माझा अंदाज होता. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मला काही पत्रकारांनी विचारलं की असं काही झालं आहे का? पण मला खरोखरचं बैठकीत असं काही जाणवलं नाही. अन्यथा मी लगेच एकनाथ शिंदे यांना विचारलं असतं”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्र्यांची गैरहजेरी? चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं कारण

आज मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे. यावर मंत्री बावनकुळे म्हणाले, “राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग चालू आहे. अनेक मंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संख्या कमी होती. मंत्र्यांच्या गैरहजेरीचं दुसरं कुठलंही कारण नव्हतं. दुसरा कुठलाही विषय नाही. अनेक मंत्री हे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रभारी आहेत. त्यामुळे ते त्या-त्या जिल्ह्यांमध्ये आहेत. या मंत्र्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती. त्यानंतर ते आपापल्या भागात गेले आहेत.”

‘…तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा’, अंजली दमानिया यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. दमानिया यांनी आक्रमक होत मोठा इशारा देत थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. दमानिया म्हणाल्या की, “हा जमीन व्यवहार रद्द करणारे अजित पवार कोण? हा व्यवहार रद्द करण्याचा अधिकार त्यांना नाही. या जमीनीच्या व्यवहार प्रकरणात आधी सांगितलं गेलं की २१ कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार, बावनकुळे म्हणतात की आम्हाला ते पैसे नको, फक्त व्यवहार रद्द करून हवा. त्यानंतर अशी माहिती समोर आली की ४२ कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. पण कायद्याने हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात, ना देवेंद्र फडणवीस रद्द करू शकतात. ना मोदी हा व्यवहार रद्द करू शकतात. यांच्या कोणाकडेही ते अधिकार नाहीत”, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं.

“मी कंत्राटदाराला बदडून काढण्याची धमकी दिली”; नितीन गडकरींचं विधान

नितीन गडकरी भाषणातून अनेकदा आपल्याच सरकारवर टीकाही करतात. सत्य मांडण्यासाठी कुणालाही न घाबरणारे अशीही त्यांची ओळख. नागपूरच्या आयआयएममध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गडकरींनी एका कंत्राटदाराला थेट खोलीत दरवाजा बंद करून बदडून काढण्याची धमकी दिली होती, असा खुलासा केला. गडकरींच्या तोंडून हे ऐकताच सर्वांच्या भूवया उंचावल्या. आयआयएमच्या बाजूला असलेल्या एम्समध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा पूर्ण प्रभाव सोडला आहे. मी हे म्हणू शकतो कारण मी सरकारमध्ये आहे. मी गध्याला घोडा कसा म्हणू, असा प्रश्नही गडकरींनी केला. त्यातील मोठ्या कंत्राटदाराने खूप बेकार कामे केली. त्याने माझ्याकडून खूप शिव्या खालल्या. त्याला सांगितले की, दरवाजा बंद करून खूप ठोकेन, आयुष्यभर लक्षात राहील, अशा शब्दात बजावल्याचे गडकरी म्हणाले.