Maharashtra Political News: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेलं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. यातच अंजली दमानियांनी अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सार्वजनिक मंचावरून माफी मागितली आहे. यासह दिवसभरातील महत्वाची पाच राजकीय विधाने नेमकं काय आहेत? ते जाणून घेऊयात.

“५०० कोटींचं रुग्णालय अजित पवारांच्या पुतण्याला?”; अंजली दमानियांचा आरोप

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर आरोप केले आहेत. मुंबई महानगरपालिकेने ५०० कोटी रुपये खर्च करून बांधलेलं शताब्दी रुग्णालय पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्वानुसार चालवण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिलं असल्याचा आरोप केला आहे. अंजली दमानिया यांनी म्हटलं की, “५०० कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना? शताब्दी हॉस्पिटल हे एक ५८० बेडचे हॉस्पिटल, BMC ने बांधले. विरोध असतांना देखील PPP तत्वाने देण्याचा घाट घातला आणि योगायोगाने ह्यात पद्मसिंह पाटील ह्यांच्या तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्टने bid केले आहे. ह्याच्याच जवळ RSS एक हॉस्पिटल बांधत आहेत आणि हे तयार हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस तुम्ही एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र हा सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा”, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

नितीन गडकरींनी सार्वजनिक मंचावरून मागितली माफी; म्हणाले, ‘पुढच्या वेळी…’

नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव मोठ्या थाटात सुरू आहे. या महोत्सवाच्या अंतर्गत प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गायिका श्रेया घोषाल हिने आपल्‍या सुरेल आवाजात सादर करीत नागपूरकरांना आपल्‍या परफॉर्मन्‍सने आवाजात रंगवून टाकले. या कार्यक्रमाबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “मागील दहा वर्षांपासून नागपूरकरांनी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवावर भरभरून प्रेम केले. नागपूरकरांनी दिलेल्‍या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे नागपूरवासियांचे आभार मानतो. आज श्रेया घोषाल यांच्‍या कार्यक्रमालाही लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला. पटांगणावर जितके लोक होते तितकेच लोक बाहेर उभे होते, याची मला जाणीव आहे. ज्‍यांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आला नाही, त्‍यांची मी क्षमा मागतो. भविष्‍यात सर्वांना कार्यक्रमांचा आनंद घेता येईल, अशी व्‍यवस्‍था केली जाईल.”

“बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून…”, राज ठाकरे

राज ठाकरेंनी त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचा एक जुना फोटो पोस्ट करत त्यांनी बाळासाहेबांची प्रतिमा चोरणाऱ्यांवर टीका केली. हिदुत्वाच्या नावे मते मागणाऱ्यांची आपल्याला गंमत वाटते असे राज ठाकरे म्हणाले. “पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, (अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही!” असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

साधू हत्याकांडात ज्याच्यावर आरोप केले, त्याला भाजपात का घेतलं? देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण

पालघर साधू हत्या प्रकरणातील आरोपीच्या भाजपातील प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सारवासारव केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात आला आहे. मला जेव्हा हा निर्णय समजला तेव्हा मी याविषयी माहिती घेतली. मुळात या पक्षप्रवेशावरून आमच्यावर जे लोक आरोप करत आहेत ते कालपर्यंत का गप्प होते? चौधरी कालपर्यंत त्यांच्याबरोबरच होते. तेव्हा असे आरोप का केले नाहीत? म्हणजे कालपर्यंत ते (चौधरी) विरोधकांसाठी चांगले होते. आज आमच्याकडे आले तर वाईट झाले? त्या प्रकरणाचा पूर्ण तपास करण्यात आला आहे. त्या तपासातून काय समोर आलं ते सर्वांनी पाहिलं आहे. मला स्थानिकांनी सांगितलं की सर्व गोष्टींची शहानिशा करूनच पक्षप्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.”

पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजपात प्रवेश, रोहित पवारांची भाजपावर टीका

पालघर साधू हत्या प्रकरणातील आरोपीच्या भाजपातील प्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे, यामध्ये त्यांनी भाजपाने काशिनाथ चौधरी यांना पक्षात प्रवेश दिल्याचे म्हटले. तसेच ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पक्षात स्थान दिल्याने त्या साधूंच्या हत्यांमागे भाजपाच होते का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. रोहित पवार म्हणाले, “पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपाने ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपाने पक्षात घेतलं. मग पालघर हत्याकांडामागे भाजपाच होतं, असं म्हणायचं का? हेच भाजपाचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे. राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जाते हे अनेकदा सिद्ध झालं. कोणत्याही विषयाचं राजकारण करून भाजपाकडून सत्तेची पोळी भाजली जाते पण यामुळं सामाजिक संतुलन बिघडून त्याचं मोठं नुकसान राज्याला सहन करावं लागतं, याचातरी भाजपाने विचार करावा,” असेही रोहित पवार म्हणाले.