Maharashtra Political News: राज्यात येत्या काही दिवसांत तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबईमध्ये नुकतेच महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांच्या विरोधात मोर्चा काढला होता. यावर आज भाजपा नेते अशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका केली होती. त्यांच्या या टिकेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात राज्यात दिवसभर चर्चेत असलेल्या ५ राजकीय विधानांचा आढावा घेऊया.

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिका…”

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीचा आरोप करत महाविकास आघाडी आणि मनसेने मुंबईत नुकताच ‘सत्याचा मोर्चा’ काढला. या मोर्चामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मतदार याद्यांमधील दुबार मतदारांवरून थेट खळ्ळखट्याक करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतर आता भाजपा नेते अशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिका पाहिल्या तर असे लक्षात येते की पहिल्यांदा मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करा, मग मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करा, म्हणजे ही एक फेक नरेटिव्हची बांधणी आहे. पण या फेक नरेटिव्हला महाराष्ट्रातील जनता केराची टोपली दाखवेल”, असे आशिष शेलारांनी म्हटले.

“जेन झी पिढीतील मुलांना हे सरकार का घाबरतेय?”

ज्यातील आणि केंद्रातील सरकार जेन झी मुलांना का घाबरतेय? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण सरकारशी दोन हात करू.” तसेच त्यांनी दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले की, “सर्व मतदारांनी शिवसेनेच्या (उबाठा) जवळच्या शाखेत जाऊन मतदार याद्यांमध्ये तुमचे नाव आहे का? कोणी तुमचे नाव वगळलेलं नाही ना? तुमचा पत्ता बदललेला नाही ना? तुमचे वय, लिंग अथवा धर्म बदललेला नाही ना याची खात्री करा.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणूक आयोगाने मतदारांसाठी १ जून ही कट ऑफ डेट ठेवली आहे. याचा अर्थ १ जून नंतर ज्या मुलांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले असेल त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. या मुलांना त्यांचा मतदानाचा अधिकार वापरता येणार नाही. एकीकडे जगभर याच वयातील मुले रस्त्यावर उतरून क्रांती करत आहेत. त्यांना जगाने जेन झी असे नाव दिले आहे. या जेन झी पिढीतील मुलांना हे सरकार का घाबरतंय?

“देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे पप्पू ठरवले”

आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी काही मुस्लीम मतदारांच्या नावांमधील घोळ दाखवले. यावरून त्यांनी राज ठाकरे व महाविकास आघाडीवर आरोप केला की विरोधक केवळ हिंदू मतदारांच्या नोंदींमधील घोळ दाखवून व्होट जिहाद करत आहेत.

आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेवर शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आशिष शेलार यांनी आम्हाला फुलटॉस चेंडू टाकला आहे. मुळात त्यांनी आमचा आरोप मान्य केला आहे. मतदारयाद्यांमधील घोळ त्यांनी मान्य केले आहेत.”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “मी आशिष शेलार यांचे अभिनंदन करतो. त्यांनी नकळतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे पप्पू ठरवले आहे. सहसा भाजपात कोणी फडणवीसांविरोधात बोलण्याचे धाडस दाखवत नाही. परंतु, शेलार यांनी ते धाडस दाखवले. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातील मतदार याद्या सदोष असल्याचे मान्य केले.”

“त्यांच्या बुद्धीला आता गंज लागला आहे”

भाजपा नेते आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांनी आज महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकाराविरोधात काढलेल्या मोर्चावर आणि राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टिकेला आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये संदीप देशपांडे म्हणाले की, “आशिष शेलार यांची बुद्धी आधी चांगली होती. आता त्या बुद्धीला गंज लागला आहे. कारण सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगले मंत्रिपद दिले नाही त्यामुळे हे असू शकेल. आम्ही जी दुबार मतदारांची यादी दाखवली त्यात हिंदूच मतदार आहेत इतर धर्माचे नाहीत हे शेलार कशाच्या आधारावर बोलत आहेत?”

“महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट कसा लीक झाला?”

सातारा जिल्ह्यामधील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या मृत महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती. त्यामध्ये दोन जणांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत या घटनेबाबत काही महत्वाचे सवाल उपस्थित केले आहेत. या प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट लीक कसा झाला? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

“या घटनेकडे माणुसकीच्या नात्याने पाहिले पाहिजे. सरकारमधील काही नेत्यांकडून अतिशय असंवेदनशीलपणे काही विधाने करण्यात येत आहेत, हे अतिशय दुर्देवी आहे. या घटनेतील मुलगी कर्तुत्वान होती. दुर्देवाने कुठेतरी हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना लोकांमध्ये आहे. तसेच महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट कसा लीक झाला? त्याहीपुढे हा सीडीआर रिपोर्ट ठरावीक लोकांना कसा समजला? आरोप-प्रत्यारोप झाले, मग ती मुलगी कोणाची तरी लेक आहे ना, तरीही तुम्ही अशा प्रकारचे विधाने करता?”, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी टीका केली.