राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बारामती जाऊन टप्प्यात कार्यक्रम करण्याची जी भाषा केली त्यावरुनच पवारांनी हल्लाबोल करत शेलक्या शब्दांमध्ये भाजपाचा समाचार घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भाजपामध्ये आता जे नाते काम करतात त्यात सगळ्यात ताकदवान नेता देवेंद्र फडणवीस आहे. कुणी काहीही म्हटलं, कितीही गप्पा मारल्या तरी आहे ते आहे. असं असताना आपण काही लोकांना संधी दिली,” असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या बोलण्याचा रोख हा चंद्रशेखर बावनकुळेंच्या दिशेने होता ते पुढील वाक्यामध्येच कळून आलं. बावनकुळेंनी सप्टेंबर महिन्यात बारामतीमधूनच पवार कुटुंबियांना दिलेल्या आव्हानाचा अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे उल्लेख केला.

“संधी कुणाला द्यावी हा तुमचा अधिकार आहे. आता ज्यांना संधी दिली ते आपल्या सभागृहाचे सदस्य आहेत. महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा विदर्भावर अन्याय केला. काहीच काम केलं नाही. अशाप्रकारचं चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो,” असं अजित पवार म्हणाले. “तुम्ही कितीही टीका केली तरी मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सर्वांचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न आम्ही महाविकासने केला आणि आमची आघाडी होती तेव्हाही केला. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा त्यावेळीही आम्ही तसा प्रयत्न केला,” असं अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा >> “बाबांनो, रात्री १२ ते ३…”; विनायक मेटे, जयकुमार गोरेंचा उल्लेख करत हिवाळी अधिवेशनात अजित पवारांची सर्व आमदारांना विनंती

“पण अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यावर आपल्यानंतरचे नेते हे बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अशाप्रकारच्या वल्गना ते करतात. आता आमचं तिथं काम आहे खरंच तिथं करेक्ट कार्यक्रम होणार आहे का?” असा उपहासात्मक प्रश्न अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांकडे पाहून विचारला.

“जर मी मानावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन. मी महाराष्ट्राला माहितीय. जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना मी कुणाचंही ऐकत नाही. मी कुणाच्या बापाचंही ऐकत नाही हे पण खरं आहे. गाडी फारच फास्ट चाललीय. फास्ट गाडीचा कधीही अपघात होऊ शकतो,” अशा सूचक शब्दांमध्ये अजित पवारांनी बवानकुळेंना धीराने घेण्याचा सल्ला दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra winter session 2022 ajit pawar slams bjp leader in front of devendra fadnavis scsg