सांगली : आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत समज देण्यास आमचे मुख्यमंत्री समर्थ आहेत, मात्र ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव सभे’त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. फडणवीस यांनी तुमचे काय घोडे मारले आहे असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत उपस्थित केला. विरोधकांच्या गैरकारभाराचा समाचार घेण्यासाठी महायुतीतर्फे एक ऑक्टोबर रोजी ‘इशारा सभा’ घेऊन विरोधकांनी केलेल्या वक्तव्याचेही प्रदर्शन ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपच्या ग्रामीण जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. सत्यजित देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, नीता केळकर, दीपक शिंदे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, वैभव पाटील आदी उपस्थित होते.
आ. पडळकर यांनी जे वक्तव्य केले ते चुकीचे होते. त्यांनी राजारामबापू पाटील यांना नमस्कार करून आमदार जयंत पाटील यांच्या भ्रष्टाचारावर बोलायला हवे होते असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, जाहीर सभेतील वक्तव्याचा समाचार त्यांनाच घेता येतो असे नाही. मात्र, यावेळी अनेक वक्त्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांनी त्यांचे काय घोडे मारले? त्यांनी मराठा आरक्षण दिले, त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जाती, जमातीच्या सवलती दिल्या, हे चुकीचे केले का? जातीय तेढ निर्माण करायचा विरोधकच प्रयत्न करत आहेत असा थेट आरोप त्यांनी केला.
पालकमंत्री म्हणाले, जिल्हा बँकेची चौकशी झालीच पाहिजे, नोकरभरती आाणि नियमबाह्य कर्जवाटप कसे झाले याची माहिती समोर यायला हवी. लॉटरी घोटाळ्यात कोण गुंतले होते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दारात कोण बसले होते हे समोर आणण्याचे काम आम्हाला करावेच लागेल. याचा जाहीर पंचनामा १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेत मी करणार आहे. यावेळी ध्वनिचित्रफीत दाखवून कोणी कशी वक्तव्ये केली याचाही पंचनामा करणार आहे. सर्वोदय कारखाना कसा लाटला, कारखान्याचे गाळप किती, मोलॅसिस कुठे जाते आदी प्रश्न आम्हालाही पडत आहेत. या सर्व बाबींची चौकशी करण्याची वेळ आली आहे. आमदार पडळकर यांनी वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी करण्याऐवजी कारखान्यात काय चालले आहे याची माहिती घेऊन भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणावा. एक ऑक्टोबर रोजी रावण दहन केले जाते. यावेळी जातीयवादाचा रावणही दहन करायला हवा.
खासदार सुप्रिया सुळे यांनी एकादशीला मला मटण चालते असे म्हटले, हा वारकऱ्यांचा अवमान नाही का, असा सवाल करून छत्रपती संभाजी महाराज यांना खासदार करत असताना पेशवे आता छत्रपतींना खासदारकी देणार असे खा. शरद पवार म्हणाले होते. इस्लामपूरच्या सभेत अमोल मिटकरी जातीयवादावर बोलत असताना ही मंडळी हसत होती. हा जातीयवाद नाही का? असा सवाल करत मंत्री पाटील यांनी मागील कारकिर्दीची चौकशी करावी यासाठी वेळ पडली तर मी मंत्री पदाचा राजीनामा देऊन एक आमदार म्हणून उपोषणालाही बसणार असे सांगितले.